शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात लुकआउट नोटीस काढली जावी, अशी मागणी केली आहे. सेव्ह विक्रांतच्या नावाखाली मोठा घोटाळा झाला आहे, राज्यभरातून आणि राज्याबाहेरूनही पैसा जमा करण्यात आला आहे. या पिता-पुत्राची माफिया टोळी आहे. असारोपही संजय राऊत यांनी केला आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “विक्रांत वाचवाच्या नावावार जो घोटाळा झाला आहे, सेव्ह विक्रांत घोटाळा. लबाडी, निधीचा गैरवापर. हा काही छोटा घोटाळा दिसत नाही, त्याची व्याप्ती फार मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पैसे गोळा करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या, नील किरीट सोमय्या आणि त्यांची एक माफिया टोळी. त्यांची एक माफिया टोळी आहे जी बांधकाम व्यावसायिकांकडूनही आणि अशाप्रकारे देखील पैसा गोळा करते.”

तसेच, “संपूर्ण राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरून देखील सेव्ह विक्रांतच्या नावाखाली पैसा जमा केला आहे. निधीचा गैरवापर १०० टक्के झालेला आहे. हा जो गुन्हा आहे मला वाटतं की आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला आहे आणि आता त्या हिशोबाने त्याचा तपास होईल. कालपासून जबाब नोंदवणे सुरू झाले आहे असे मला वाटते, मी काही पोलिसांचा प्रवक्ता नाही पण बऱ्याच जणांना काल बोलावलं होतं. सर्वात मोठा प्रश्न आहे की हे दोन ठग कुठे आहेत? हे जे माफियांचे सूत्रधार आहेत पैसे जमा करणारे, हे दोन ठग कुठे आहेत? त्याबद्दल भाजपाकडून आतापर्यंत काही अधिकृत विधान काही येत नाही?, त्यांना कुठे लपवलं आहे? कोणत्या ठिकाणी आहेत? ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत हे मी तुम्हाला सांगतो. मला तर भीती आहे की जोपर्यंत त्यांच्या जामीनाची व्यवस्था होत नाही, ते प्रयत्न करत आहेत परंतु होणार नाही. तोपर्यंत ते परदेशातच पळू शकतात, त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली गेली पाहिजे. कारण, मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचं खूप जुनं नातं आहे. मग जिथे मेहुल चोक्सी आहे, तिथे तर नाही पळून गेले ना ते? अँटीग्वामध्ये.” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

याचबरोबर, “माझ्या मते मुंबई पोलीस तपास करत आहे. किरीट सोमय्यांच्या बाजूने बोगस साक्षीदार तयार करण्याचे प्रयत्न त्यांच्या टोळीकडून इथे सुरू आहेत. मी राजभवनास इशारा देत आहे, जर काही चुकीचं काम केलं तर राजभवनाची उरलीसुरली लाज देखील राहणार नाही. खूप प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पोलीस गुन्हेगारांना ते जिथे कुठे असतील, तिथून लवकर पकडून घेऊन जाईल. जनतेचा जो पैसा आहे, देशाचा जो पैसा आहे जो लुटला गेला आहे, त्याचा हिशोब यांना द्यावा लागेल.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.