मुंबई : ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकाची तिसऱ्या पर्वात सहभागी होण्याची संधी हुकली आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून राजकारण झाले का? अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे. मात्र जय जवान गोविंदा पथकाने नोंदणी करण्यास उशीर केल्यामुळे नियमानुसार तिसऱ्या पर्वात संधी दिली नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची प्राथमिक फेरी २८ व २९ जून रोजी ठाणे (पश्चिम) येथील दिवंगत बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे पार पडली. या फेरीतून एकूण १६ गोविंदा पथक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील १६ गोविंदा पथकांमध्ये वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम फेरी रंगणार आहे. परंतु २०२३ व २०२४ अशी सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणारे जय जवान गोविंदा पथक यंदा हॅट्रिक मारणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, मात्र त्याआधीच हे गोविंदा पथक स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे दहीहंडीप्रेमींचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे आता ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत जय जवान गोविंदा पथकाला विशेष सादरीकरणाची तरी संधी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दरम्यान, प्रो – गोविंदा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातून जय जवान गोविंदा पथकाला वगळण्यात आल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, ‘जय जवान गोविंदा पथकाला प्रो – गोविंदा स्पर्धेत संधी दिली गेली नाही, तर त्यांचे वजन कमी होणार नाही. या गोविंदा पथकाने अनेक विक्रम रचले आहेत, त्यामुळे हे पथक छोटे होणार नाही. मात्र खेळात राजकारण होऊ नये’. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘प्रो – गोविंदा स्पर्धेमध्ये जय जवान गोविंदा पथकाला संधी दिली नाही, असे करून सरकारने राजकारणाचा स्तर खराब केला आहे. हे सरकार संपूर्णतः भ्रष्ट आहे, नीती भ्रष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार?’.
जय जवान गोविंदा पथकाचे म्हणणे काय ?
सर्वप्रथम वरळीतील ५ जुलै रोजीचा मराठीचा विजयी मेळावा आणि जय जवान गोविंदा पथकाचे ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेतून बाहेर पडणे, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही. ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वासाठी १० जून ते १४ जून २०२५ या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम ३२ संघांची यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित होते. १० जून रोजी सायंकाळी ६ वाजता नोंदणीची लिंक सुरू होणार होती, मात्र दुपारी १२ वाजताच नोंदणी प्रकियेला सुरुवात झाली. आम्ही सर्व खबरदारी घेऊन नोंदणी करीत होतो, संकेतस्थळ संथगतीने सुरू होते.
मात्र तरीही १२ वाजून ४ मिनिटांनी जय जवान गोविंदा पथकाची नोंदणी पूर्ण झाली. त्यानंतर १४ जूननंतर प्रसिद्ध होणारी अंतिम ३२ संघांची यादी अचानकपणे १२ जूनलाच प्रसिद्ध झाली. तेव्हा ३१ व ३२ व्या क्रमांकावरील गोविंदा पथकाची नोंदणीची वेळही १२ वाजून ४ मिनिटे होती, मात्र आम्हाला संधी देण्यात आली नाही. ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेमुळे दहीहंडी उत्सव जागतिक स्तरावर पोहोचत असून गोविंदांना विशेष ओळख मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणात ‘प्रो – गोविंदा’ आयोजन समिती आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून गांभीर्याने लक्ष घातले जाण्याची अपेक्षा होती, मात्र असे काहीही झाले नाही. ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेत सहभागी होऊन खेळल्यानंतरचा निकाल आम्हाला मान्य होता. मात्र अशाप्रकारे ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वातून बाहेर पडल्यामुळे आमच्या तीन महिन्याच्या मेहनतीवर पाणी फिरलेले आहे, असे जय जवान गोविंदा पथकाचे व्यवस्थापक विजय निकम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या आयोजकांचे म्हणणे काय ?
प्रो – गोविंदा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातून एकूण १२७ गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या नियमानुसार सर्वप्रथम नोंदणी करणाऱ्या ३२ संघांना स्पर्धेत स्थान स्थान दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तरीही राजकारण करून आयोजकांनी बाद केले, या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. जय जवान गोविंदा पथक नोंदणी प्रक्रियेत ४१ व्या स्थानी होते. तसेच गतवर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले बालवीर गोविंदा पथक नोंदणी प्रक्रियेत ३७ व्या क्रमांकावर होते.
त्यामुळे यापूर्वीच्या ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेच्या पर्वामध्ये सहभागी झालेली गोविंदा पथके पहिल्या ३२ संघात नोंदणी न करू शकल्यामुळे तिसऱ्या पर्वात सहभागी होऊ शकलेली नाहीत. तसेच जय जवान गोविंदा पथकाने ५ जुलै २०२५ रोजी एका कार्यक्रमात मानवी मनोरे रचल्यामुळे स्पर्धेतून वगळण्यात आले, असा दावा करण्यात येत आहे. मात्र स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्यामुळे हा आरोप पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे, असे ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट केले.