मुंबई : जैन समुदायासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वात नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली तथापि, मुघल बादशाह अकबर याने जैन धर्मीयांची भावना समजून घेऊन गुजरातमध्ये सहा महिन्यांसाठी मांसाहारावर बंदी घातली होती. परंतु आपल्याकडे सरकार आणि महापालिका पर्युषण काळात नऊ दिवस कत्तलखाने बंदीची मागणी विचारातच घेत नसल्याने याबाबत अकबर बादशाहला समजावणे सोपे होते, पण महाराष्ट्र सरकार आणि महापालिकांना समजावणे कठीण असल्याचा युक्तिवाद जैन समुदायाच्या दोन याचिकाकर्त्या ट्रस्टतर्फे करण्यात आला.

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या या युक्तिवादावर टिप्पणी करताना, मग तुम्हाला महापालिकेला ही बाब समजावून सांगायला हवी, असे मिश्किलपणे म्हटले. त्याचवेळी, पर्युषण काळात नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेला कोणत्या तरतुदीअंतर्गत द्यावेत ? याचिकाकर्त्यांना ही मागणी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का ? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. दिगंबर पंथीयांतर्फे २० ते २७ ऑगस्ट, तर श्वेतांबर पंथाकडून २१ ते २८ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणाऱ्या पर्युषण काळात एक दिवसाऐवजी नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्या ट्रस्टने केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने उपरोक्त प्रश्न उपस्थित करून याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला.

अहमदाबादपेक्षा मुंबईत जैन धर्मीय अधिक

अहमदाबादपेक्षा मुंबईत जैन समुदायाची संख्या अधिक आहे. शिवाय, तेथे पर्युषण काळात प्राण्यांच्या कत्तलीवर पूर्णपणे बंदी आहे. याउलट मुंबई हे बहुभाषिक शहर असल्याने येथे नऊ दिवस कत्तलखाने बंद करता येणार नाहीत आणि नऊ दिवस कत्तलखाने बंद न करण्याचा निर्णय धोरणात्मक आहे, असे कारण देऊन मुंबई महापालिकेने आपली मागणी फेटाळ्याचे याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळकर आणि वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे, मुंबईत सद्यस्थितीला मांसाहार करणाऱ्यापेक्षा शाकाहारींची संख्या अधिक आहे. शिवाय सध्या श्रावण महिनाही सुरू असल्याने मांसाहार करणाऱ्यांची संख्या कमीच आहे, असेही ढाकेफाळकर आणि चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

पर्युषण काळात दोन दिवस बंदीचा निर्णय दिशाभूल

याचिकाकर्त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी पर्युषण काळात एक दिवसाऐवजी दोन दिवस कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २४ आणि २७ ऑगस्ट या दोन दिवशी कत्तलखाने बंद राहणार आहेत. शिवाय, देवनार कत्तलखान्यावर केवळ मुंबईच नाही, तर मुंबई महानगरप्रदेशातील अन्य पालिकाही अवलंबून आहेत, असे महापालिकेच्या वकील ऊर्जा धोंड यांनी न्यायालयाला सांगितले. तथापि, महापालिकेचा दोन दिवस कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय हा पर्युषण काळासाठी घेण्यात आलेला नाही. किंबहुना पर्युषण काळात केवळ २४ ऑगस्ट रोजी एकच दिवस कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार असून २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्याने ते बंद असणार आहेत, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला.

न्यायालयाचे म्हणणे…

अहमदाबाद येथील निर्णयाचा दाखला याचिकाकर्ते देत असले तरी पर्युषण काळात नऊ दिवस कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीचा याचिकाकर्त्यांना कोणत्या तरतुदींतर्गत अधिकार आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच, या प्रकरणी कोणताही आदेश देण्यापूर्वी आम्हाला सरकार आणि महापालिकेचे म्हणणे ऐकावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिकेने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळताना आतापर्यंत मुंबईत जैन समुदायाची लोकसंख्या कमी असल्याचे कारण नोंदवले असल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. त्यामुळे, आम्हाला जैन समुदायाच्या भावनांचा आदर असला तरी या टप्प्यावर कोणताही स्थगिती आदेश देता येणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.

अकबर बादशाहपेक्षा सरकार-पालिकेला समजावणे कठीण

मुघल बादशाह अकबर याने जैन धर्मीयांची भावना समजून घेऊन सहा महिन्यांसाठी मांसाहारावर बंदी घातली होती. तथापि, आपल्याकडे सरकार आणि महापालिका पर्युषण काळात नऊ दिवस कत्तलखाने बंदीची मागणी विचारात घेत नाही. थोडक्यात, जैन समुदायाच्या पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्यासाठी अकबर बादशाहला मनवणे सोपे होते, पण आपल्याकडील सरकार आणि महापालिकेला समजावणे कठीण असल्याचे ढाकेफाळकर यांनी मिश्किलपणे म्हटले. हाच धागा पकडून, त्यासाठी तुम्हाला महापालिकेला पटवावे लागेल, अशी टिप्पणी मुख्य न्यायमूर्तींनी केली. त्यावर न्यायालयात एकच हशा पिकला.