मुंबई : देशातील विविध आयआयटीसह अन्य महत्त्वाच्या संस्थांमध्ये शिकविण्यात येणाऱ्या जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, गणितीय सांख्यिकी आणि भौतिकशास्त्र या सात विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेएएम २०२६ परीक्षेचे वेळापत्रक भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईकडून (आयआयटी मुंबई) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जेएएम परीक्षा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, या परीक्षेसाठी ५ सप्टेंबरपासून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

देशातील विविध संस्थांमध्ये एम.एस्सी, एम.एस्सी (टेक), एम.एस्सी-एम.टेक दुहेरी पदवी, एम.एस (संशोधन), एम.एस्सी – पीएचडी एकात्मिक व दुहेरी पदवी सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेएएम ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचे आयोजन आयआयटी मुंबईकडून करण्यात येत आहे. जेएएम ही परीक्षा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना १२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. जेएएम परीक्षेमध्ये मिळालेले गुण हे एका वर्षासाठी वैध असणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा बंधनकारक असणार आहे.

संगणक आधारित असलेली जेएएम ही परीक्षा देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये घेण्यात येते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना https://jam2026.iitb.ac.in/ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व पदवी शिक्षण पूर्ण केले आहे किंवा सध्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत आहेत, ते विद्यार्थी जेएएम २०२६ परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. ही परीक्षा देण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. प्रवेश संस्थेच्या धोरणाच्या अधीन राहून, भारतीय पदवी असलेले परदेशी नागरिक सुद्धा या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती https://jam2026.iitb.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याचे आयआयटी मुंबईकडून सांगण्यात आले.

या शैक्षणिक संस्थांमध्ये घेता येणार प्रवेश

जेएएम ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देशातील विविध आयआयटीमधील निरनिराळ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तीन हजार जागांवर प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयआयईएसटी), पुण्यातील आयसर, भोपाळमधील आयआयपीई, जेएनसीएएसआर, एसयूईटी, आयआयएस्सी यांसारख्या देशातील विविध खासगी अभियांत्रिकी संस्थांमधील जवळपास २३०० हून अधिक जागांवर विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळणार आहे.