JEE Advanced 2025 Result Out :आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जेईई ॲडव्हान्स २०२५ परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुलांमधून रजित गुप्ता तर मुलींमधून देवदत्त माझी प्रथम आले आहेत. जेईईच्या निकालमध्ये पहिल्या १० जणांमध्ये पार्थ वर्तक आणि साहिल देव या मुंबईतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदाच्या जेईईचे आयोजन आयआयटी कानपूरने केले होते.
जेईई ॲडव्हान्स २०२५ चा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला. या परीक्षेत आयआयटी दिल्ली झोनमधून परीक्षा दिलेला रजित गुप्ता हा ३६० पैकी ३३२ गुण मिळवून कॉमन रँक लिस्टमध्ये (सीआरएल) अव्वल आला. त्याचवेळी आयआयटी दिल्ली झोनमधील सक्षम जिंदाल हा ३३२ गुण मिळवून सीआरएलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आयआयटी खरगपूर झोनमधून परीक्षा दिलेली देवदत्त माझी ही ३६० पैकी ३१२ गुण मिळवून महिलांमध्ये अव्वल आली आहे. मात्र कॉमन रँक लिस्टमध्ये १६ व्या क्रमांकावर आहे.
सीआरएलमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिलेला माजिद हुसेनने ३३० गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेमध्ये पहिल्या १० जणांमध्ये मुंबईतून पार्थ वर्तक व साहिल देव यांनी बाजी मारली आहे. पार्थ वर्तक याने ३६० पैकी ३२७ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला आहे, तर साहिल देव याने ३६० पैकी ३२१ गुण मिळवून सातवा क्रमांक पटकावला आहे. या दोघांनीही आयआयटी मुंबई झोनमधून परीक्षा दिली होती.
आयआयटी कानपूरने १८ मे रोजी घेतलेल्या जेईई अडव्हान्स २०२५ परीक्षेच्या पेपर १ व २ साठी देशभरातून १ लाख ८७ हजार २२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १ लाख ८० हजार ४२२ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. यामध्ये १ लाख ३९ हजार ८५ मुले तर ४१ हजार ३३७ मुलींचा समावेश आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५४ हजार ३७८ विद्यार्थी पात्र ठरले. यामध्ये ९ हजार ४०४ मुली आहेत. आयआयटी कानपूरने आयोजन केलेली ही परीक्षा देशातील २३० शहरांमध्ये ७१२ केंद्रांवर घेण्यात आली होती.
पहिल्या १० मध्ये आयआयटी दिल्ली झोनची बाजी
जेईई ॲडव्हान्स २०२५ चा जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये आयआयटी दिल्ली झोनमधून परीक्षेला बसलेल्या चार विद्यार्थ्यांनी पहिल्या १० जणांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याखालोखाल आयआयटी मुंबईतील तीन विद्यार्थ्यांनी, आयआयटी हैदराबादचे दोन तर आयआयटी कानपूर झोनमधील एका विद्यार्थ्यांने पहिल्या १० जणांच्या यादीत स्थान मिळवले आहे.