मुंबई : ‘जिगीषा’ या प्रसिध्द नाट्यसंस्थेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे खास नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२, २३ आणि २४ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या नाट्यमहोत्सवात नाट्यविषयक पुस्तकांचे प्रदर्शन, अभिवाचन, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचे तीन प्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे.

‘एम. जी. एम’ आणि ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन’ या दोन संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जिगीषा नाट्यसहवास’ या महोत्सवाचे हे तिसरे पर्व असून त्याचे उद्घाटन २२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एम. जी. एम. परिसरातील रुक्मिणी सभागृहात होणार आहे.

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता हा उद्घाटन सोहळा होणार असून या सोहळ्यात जिगीषातर्फे नोकरी, उपजीविका सांभाळून रंगभूमीवर सातत्याने कार्यरत असलेल्या रंगकर्मीला ‘मिलिंद सफई पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार दिग्दर्शक, अभिनेते अभिजीत झुंझारराव यांना देण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर त्याच सभागृहात सतीश आळेकर लिखित, अनुपम बर्वे दिग्दर्शित, सुव्रत जोशी आणि गिरीजा ओक अभिनित ‘ठकीशी संवाद’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

या जिगीषा सहवास नाट्यमहोत्सवांतर्गत एम. जी. एम परिसरात नाट्यविषयक अभिनव पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात पॉप्युलर, मौज, राजहंस, मॅजेस्टिकसारख्या नामवंत प्रकाशन संस्थांची नाट्यविषयक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जयेश आपटे दिग्दर्शित, सिध्देश पूरकर आणि पर्ण पेठे अभिनित ‘तोत्तोचान’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. तर तिसऱ्या दिवशी, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ‘नरहर कुरंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ याचे अभिवाचन अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर सादर करणार आहेत. तर रात्री ८ वाजता संत एकनाथ नाट्यगहात ‘जिगीषा – अष्टविनायक’ निर्मित, क्षितिज पटवर्धन लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाच्या प्रयोगाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

या नाटकात अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह समिधा गुरू, जाई खांडेकर, जयश्री जगताप, अतुल महाजन, सुयश झुंझुरके यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या नाट्यमहोत्सवाचा भरभरून आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.