Jitendra Awhad Protest at Vidhan Bhavan for Nitin Deshmukh : विधानभवन परिसरात गुरुवारी (१७ जुलै) दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री १२ वाजता विधानभवनातून अटक केली. याची माहिती मिळताच जितेंद्र आव्हाड तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि त्यांनी पोलिसांच्या कारसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले.
जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती. त्यामुळे पोलिसांनी आव्हाडांना गाडीसमोरून खेचत बाहेर काढले. त्यानंतर पोलीस नितीन देशमुखला घेऊन गेले. या घडामोडींनंतर आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
विधानसभा अध्यक्षांनी शब्द फिरवला : आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मकोकासारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पसार होतो आणि जो मार खातो त्याला पोलीस घेऊन जातात. विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता की नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवलं.” दरम्यान, रात्री १ वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवारही विधीमंडळ परिसरात दाखल झाले होते.
रोहित पवारांचा संताप
आमदार रोहित पवार म्हणाले, “आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो. विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला मकोकाची ४ माणसं तुम्ही घेऊन येता. मात्र, विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष हे खरे बॉस आहेत. दिलेला शब्द जर ते पळत नसतील तर ही लोकशाहीची च्येष्टा आहे. या गुन्हेगारांचा माज उतरवावा लागेल. नाहीतर हे इतके पुढे जातील. राज्यात महिला सुरक्षित राहणार नाहीत.”
मध्यरात्री विधीमंडळ परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा
या घटनेनंतर आम्दार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते हे मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी नितीन देशमुखला तिथे नेलं नव्हतं. पोलिसांनी आव्हाडांना सांगितलं की नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड व रोहित पवार हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
नितीनला मार लागलाय : जितेंद्र आव्हाड
दरम्यान, आव्हाड यांना समजलं की वैद्यकीय तपासणीसाठी नितीन देशमुखला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर आव्हाड व रोहित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात पोहोचले. तिथे आव्हाडांनी नितीन देशमुखची भेट घेऊन त्याची विचारपूस केली. त्यानंतर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की “नितीनला मार लागलाय, त्याला काही व्हायला नको. अलीकडेच त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.”