मुंबई : परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीने एक चित्रफीत पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धमकी दिल्याचे समोर आले आहे. आव्हाड यांनी या बाबत पोलिसांत तक्रार दिलेली नाही, तसेच मी असल्या धमक्या घाबरत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी या बाबत समाज माध्यमात संदेश प्रसारीत करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरण लावून धरले आहे. विधिमंडळासह प्रसार माध्यमातून दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह धरला आहे. या हत्या प्रकरणात गोट्या गीते हा मुख्य आरोपी असून, तो फरार आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या फरार आरोपीने नऊ मिनिटांची चित्रफीत तयार करून जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस रोहित पवार यांनी ‘फरार गुंडात इतकी हिमत कुठून येते. गृह विभाग काय करतो आहे. गृहमंत्री उत्तर द्या,’ असा संदेश समाज माध्यमावर प्रसारीत केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आव्हाड यांची मुंबईतील घरी भेट घेऊन या प्रकरणात आणखी लक्ष घालण्याची मागणी केली होती.

‘मी धमक्यांना घाबरत नाही. मी वंजारी असल्याचे सांगून आणि वंजारी समाजाच्या गुन्हेगाराला पाठिशी घालून मला कोणतीही सहानुभूती मिळवायची नाही. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी हातात बंदूक घेऊन मला धमकी देणारी चित्रफीत तयार करतो. मुब्रा येथे येऊन माझ्या घराची रेकी केली जात असेल आणि तरीही पोलिसांना फरार आरोपी सापडत नाही. अशा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल ही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे महादेव मुंडे हत्या प्रकरण

परळीतील तहसील कार्यालयासमोर २० ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली होती. आतापर्यंत या प्रकरणात एकही आरोपी अटक करण्यात आली नाही. महादेव मुंडे यांच्या हत्येला तब्बल २१ महिने लोटून गेली. या प्रकरणी पोलिस एकूण पाच संशयित आरोपींची चौकशी करीत आहेत. या प्रकरणी मागील काही महिन्यापासून ज्ञानेश्वरी मुंडे या पतीला न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.