भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही स्वभावाप्रमाणे सडत चालला आहे, अशी टीका केली. यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिला. त्यांनी चित्रा वाघ यांचं ट्वीट रिट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ताई मी कुठली ही शिवी दिली नाही. फक्त मला कोणाची तोंडं उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. ‘तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम में सब नंगे हैं’ बापूआर्मस्ट्राँग आठवत असेल ना. यापुढे स्वभावाप्रमाणे वागीन. अँटी चेम्बरमधले विनोद आत्ता बस.”

“बहिणीला सांभाळून घेत आलो, पण…”

“आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता. माझा स्वभाव आपल्याला माहित आहे. मी सहन करतो, पण मला त्यांनीच बोलावे ज्यांचे हात स्वच्छ आहेत. अजून खूप बोलू शकतो. बहिणीला सांभाळून घेत आलो, पण…”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांनी इशारा दिला.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांची भर पत्रकार परिषदेत शिवीगाळ, ‘या’ मुद्द्यावर ‘मुंब्रा बंद’चा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्वभावाप्रमाणं जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही सडत चाललाय”

चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, “सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली. आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय.”