मुंबई : जे.जे. रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. बेला वर्मा यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांची जी.टी. रुग्णालयामध्ये बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील आदेश गुरूवारी काढण्यात आले. त्यामुळे डॉ. बेला वर्मा यांना जे.जे. रुग्णालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जे. जे. रुग्णालयामधील बालरोग चिकित्साशास्त्र विभागातील महिला निवासी डॉक्टरने १६ जुलै रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
विभागप्रमुख डॉ. बेला वर्मा निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ करीत असल्याने या डॉक्टरने हा निर्णय घेतल्याचा आरोप करीत या विभागातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदेलनाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभाग, तसेच रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशीदरम्यान रुग्णालयाकडून विभागप्रमुख डॉ. बेला वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तसेच निवासी डॉक्टरांच्या मागण्या व अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आला आहे.
डॉक्टरांची बदली न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही ‘मार्ड’ संघटनेने दिला होता. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय मागे घेतला. डॉ. बेला वर्मा यांची बदली करावी, या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम होते. मात्र रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी काळ्या फिती बांधून रुग्णसेवा सुरू ठेवली होती. त्यानंतर डॉ. बेला वर्मा यांची लवकरच बदली करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. बेला वर्मा यांच्या बदलीसंदर्भातील आदेश गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार डॉ. बेला वर्मा यांना जे.जे. रुग्णालयातून कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांची बदली जी.टी. रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे.