मुंबई : पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर शनिवार, (२८ मे)  रात्री ११ पासून १४ तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. पोईसर पुलाच्या कामासाठी बोरिवली ते कांदिवलीदरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ‘ब्लॉक’ असेल. त्यामुळे बोरिवली-गोरेगावदरम्यान धिम्या मार्गावरून लोकल धावतील. शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत ‘मेगा ब्लॉक’ असेल. विरारच्या दिशेने जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस अंधेरी-बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून धावतील. तर मुंबई सेन्ट्रलच्या दिशेने येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस बोरिवली-गोरेगावदरम्यान अप लोकल मार्गावरून धावतील.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ असेल. या कालावधीत सीएसएमटीतून सुटणाऱ्या धिम्या लोकल विद्याविहापर्यंत जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे भायखळा, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांत लोकलला थांबा असेल. त्यानंतर पुन्हा धिम्या मार्गावर लोकल वळवण्यात येतील. सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या धिम्या लोकलही विद्याविहारपासून जलद मार्गावर धावतील.

हार्बरवरही सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० पासून ते दुपारी ४.४० पर्यंत ‘मेगा ब्लॉक’ होणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगावदरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.