कंत्राटदारासह पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

त्कालीन मुख्य अभियंत्यांसह कार्यकारी अभियंत्यांचा समावेश असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काळू धरण प्रकल्प गैरव्यवहार प्रकरण

मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या काळू धरण प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याचे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याआधारे या विभागाने कंत्राटदारासह पाच शासकीय अधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये तत्कालीन मुख्य अभियंत्यांसह कार्यकारी अभियंत्यांचा समावेश असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात शहरीकरण होऊ लागले असून त्या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने धरण बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून हे धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. या धरणाचे आतापर्यंत ३० टक्के काम झाले असून ठेकेदाराला सुमारे १०८ कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. २०१२ मध्ये या धरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यानंतर न्यायालयाने धरणाच्या कामाला स्थगिती आदेश दिले होते. तेव्हापासून धरणाचे काम अद्यापही बंद अवस्थेत आहे. दरम्यान, या धरणाच्या कामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. या आदेशानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमध्ये धरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आली असून त्याआधारे कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

प्रकरणातील आरोपी

एफ. ए. इंटरप्रायझेसचे निसार फतेह मोहमद खत्री आणि त्याचे इतर भागीदार, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश गोपाळराव बाबर, कोकण प्रदेश जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता बाबासाहेब भाऊसाहेब पाटील, कळव्याचे तत्कालीन अधीक्षक अभियंता सतीश गुंडप्पा वडगावे, नवी मुंबई पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयवंत मुरलीधर कासार आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता हरिदास केरा टोणपे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

गैरव्यवहार काय आहे?

काळू धरणाच्या कामासाठी २००९ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा चार कंपन्यांनी भरल्या होत्या. त्यामध्ये एफ. ए. एन्टरप्रायजेस या कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला. प्रत्यक्षात मात्र एफ. ए. एन्टरप्रायजेसचे निसार खत्री आणि त्यांच्या भागीदारांनी निविदा प्रक्रियेत स्पर्धा झाली असल्याचे भासविले. त्यासाठी निविदा प्रक्रियेकरिता कंपन्यांच्या नावाने बनावट निविदा भरण्यात आल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kalu dam scam issue