मुंबई : मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपाखाली रवी वर्मा (२७) या अभियंत्याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. समाज माध्यमावर तरुणीच्या प्रोफाईलद्वारे तरुणाला पाकिस्तानी गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा बेलापूरमध्ये एका खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता होता. ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरवते. आरोपी गोदीत कामानिमित्त जात असे. त्याच्याकडे गोदीचे नकाशे व छायाचित्रे होती. समाज माध्यमावरून संपर्कात आलेल्या तरूणीला तो ही माहिती पुरवत होता. हा ‘मधूजाला’चा (हनी ट्रॅप) प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वर्मा याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार तो नोव्हेंबर २०२४ पासून कथित तरुणीच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. वर्माबरोबरच आणखी एका व्यक्तीचीही माहिती मिळाली असून तोही पाकिस्तानी असल्याचा संशय आहे.