लहान मुलांच्या आकर्षणाचे स्थळ असणाऱ्या दक्षिण मुंबईतील ‘म्हातारीच्या बुटा’चे रचनाकार सोली आरसीवाला काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आरसीवाला यांचे नुकतेच वयाच्या ९१व्या वर्षी वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. सध्या या वास्तूच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बुटामध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र दुरुस्ती पूर्ण झाल्यावर वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाचा उल्लेख असलेली दगडी पाटी त्या ठिकाणी लावण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मलबार हिलच्या टोकावर कमला नेहरू उद्यानात उभ्या असलेल्या ‘म्हातारीच्या बुटा’ला प्रत्येक मुंबईकरांनी आपल्या बालवयात भेट दिली आहे. ही वास्तू लहानग्यांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांना आकर्षित करीत असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. परंतु, या वास्तूवर कुठेही त्याच्या रचनाकाराचा उल्लेख आढळत नाही. शिवाय गेल्या कित्येक वर्षांत बुटाच्या वास्तुरचनाकाराबाबत उलगडा झाला नाही. मात्र या वास्तूचे रचनाकार सोली आरसीवाला यांनी वयाच्या ९१ वर्षी कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या वलयात न राहता जगाचा निरोप घेतला आहे. म्हातारीच्या बुटाबरोबरच विहार तलाव येथील उद्यानात एके काळी असणाऱ्या चंद्राच्या वास्तूची रचनाही त्यांनी केली होती.

आरसीवाला यांनी स्थानिक प्रशासकीय संस्थांपासून राष्ट्रीय पातळीवरील संशोधन सस्थांमध्ये काम केले होते. पर्यावरण विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या आरसीवाला यांनी १९५० च्या सुमारास मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागात अभियंता म्हणून नोकरी केली. त्यानंतर सुमारे १५ वर्षे वीरमाता जिजाबाई तांत्रिक महाविद्यालयात त्यांनी उप-प्राचार्य हे पद सांभाळले. शिवाय ‘निरी’ या संस्थेत संचालक पदाची सूत्रेदेखील त्यांनी सांभाळल्याची माहिती आरसीवाला यांची मुलगी झवेरा बनाजी यांनी दिली. मात्र ऐंशीच्या दशकानंतर त्यांनी काम करणे बंद केल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझे वडील अत्यंत साध्या विचारांचे आणि राहणीमानाचे होते. मुंबईतील सर्वात लोक प्रिय वास्तूचे रचनाकार असूनही त्यांनी या गोष्टीचा कधीच गवगवा केला नाही, असे झवेरा यांनी सांगितले. कित्येक वेळा ते उद्यानात जाऊन बसत आणि बुटामध्ये खेळणाऱ्या लहान मुलांना पाहून आनंदित होत असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. सध्या या वास्तूच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, ते पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या स्मरणार्थ त्यावर त्यांच्या नावाची दगडी पाटी लावण्याची विनंती आम्ही पालिका प्रशासनाला करणार असल्याचेही झवेरा यांनी सांगितले.