मुंबई : कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील राम किसन मेस्त्री चाळीत २४ सप्टेंबर रोजी वायू गळतीमुळे लागलेल्या आगीत सातजण जखमी झाले होते. त्यात ६ महिलांचा समावेश होता. सर्व जखमींवर रुग्णालयात सुरू होते. मात्र, दुर्घटनेतील सहाही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, या प्रकरणी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम किसन मेस्त्री चाळीत २४ सप्टेंबर रोजी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गळती होऊन आग लागली होती. चाळीत खानावळीचा व्यवसाय सुरू असलेल्या घरात स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गळती झाली होती. ही बाब लक्षात येताच तेथील नागरिकांनी सिलिंडर पाण्याच्या पिंपात उलटा केला. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वायू गळती होऊन अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या दुर्घटनेत शिवानी गांधी (५१), नीतू गुप्ता (३१), जानकी गुप्ता (३९), मनराम (५५), रेखा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०), पुनम (२८) हे सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने आसपासच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी रेखा जोशी, नीतू गुप्ता, पुनम यांचा मृत्यू झाला. तसेच, सोमवारी शिवानी गांधी यांची प्राणज्योत मालवली. त्यांनतर, उर्वरित तीन जखमींवर उपचार सुरू होते. त्यातील दोन्ही महिलांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचाही मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास मृत्यू झाला. सद्यस्थितीत मनराम यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, समता नगर पोलिसांनी सोमवारी युनिटचे मालक योगेंद्र मिस्त्री (४०) आणि शिवानी गांधी (५१) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), ३३६ (मानवी जीव धोक्यात आणणे), २८५ (आग अथवा ज्वलनशील पदार्थाबाबत निष्काळजी वर्तन), १८८ (शासकीय आदेशाचे उल्लंघन) आणि ३(५) (सामान्य स्पष्टीकरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.