शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली. तेव्हापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही तिला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. पण काही काळाने कंगनाला पाठिंबा देणाऱ्यांचाही एक गट सोशल मीडियावर सक्रिय होताना दिसला. या सर्व घडामोडींच्या दरम्यान कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले. त्या घटनेवर कंगनाने एक सूचक असे ट्विट केले.

आणखी वाचा- “टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का?”

कंगनाच्या जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेने ठेवला. त्यानंतर कंगनाला नोटीस बजावत अखेर बुधवारी सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्यासाठी तिच्या कार्य़ालयावर पोहोचले. या निमित्ताने कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली. कंगनाने २ ट्विट केले. “मणिकर्णिका फिल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेव बाबर… राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”, असं तिने ट्विट केलं. तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे काही निवडक फोटो पोस्ट करत त्यांना तिने ‘बाबर आणि त्याची सेना’ असं म्हटलं.

आणखी वाचा- ‘कंगनाच घर दिसलं, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अनधिकृत बांधकाम दिसत नाही?’

दरम्यान, कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्या दिल्या. पण त्यांच्या या धमक्यांना उत्तर देताना कंगनाने आपण आज (९ सप्टेंबर) मुंबईत येणार असून कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच दिलं.