लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सण-उत्सव आणि सुट्टीच्या कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असून प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. या रेल्वेगाड्यांसाठी विशेष तिकीट भाडे आकारण्यात येते. मात्र, जादा पैसे मोजूनही दुय्यम सेवा मिळत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. अलिकडेच एलटीटी-कानपूर अतिजलद एक्स्प्रेस तब्बल नऊ तास विलंबाने सुटल्याने, प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने अनेक प्रवासी अतिरिक्त पैसे मोजून विशेष रेल्वेगाडीचे तिकीट काढतात. त्यामुळे प्रवास वेळेत व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, विशेष रेल्वेगाड्या विलंबाने रवाना होत असल्याने, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन बिघडते. त्यामुळे महिला, वृद्ध प्रवासी, रुग्ण आदींना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. गाडी क्रमांक ०४१५१ कानपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५५ वाजता येणे अपेक्षित होते. त्यानुसार शेकडो प्रवासी एक्स्प्रेस सुटण्याच्या वेळेच्या आधी आले होते. मात्र, तब्बल ९ तास विलंबाने ही रेल्वे एलटीटी स्थानकात पोहचली. ही एक्स्प्रेस रात्री १२.१० वाजता स्थानकात पोहचली. त्यानंतर रात्री २.३९ वाजता एलटीटी – कानपूर अतिजलद एक्स्प्रेस एलटीटीवरून सुटली. परिणामी, अनेक प्रवाशांना तब्बल १२ तासांहून अधिक काळ स्थानकात काढावा लागला.

आणखी वाचा-पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्रमांक ०४१५१ मुंबई विभागात ८ तासांपेक्षा जास्त उशिरा आली. त्यामुळे रेल्वेगाडीला नियोजित मार्ग आणि फलाट मिळाला नाही. एलटीटीवर रेल्वेगाडीसाठी जागा उपलब्ध नसल्याने बराच कालावधी रेल्वेगाडी थांबली. रेल्वेगाडी एलटीटी येथे रात्री १२.१० वाजता आली, असे मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाच्या एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली.