जंगलात राहणारे, त्याची राखण करणारे, त्याला देव म्हणून पूजणारे आणि भक्तिभावाने, मायेने निसर्गाच्या सान्निध्यात राहून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या देवाची कथा ‘कांतारा’च्या माध्यमातून लेखक – दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी रुपेरी पडद्यावर जिवंत केली. माझ्या मातीत वाईट विचाराने पाऊल टाकणाऱ्याचं कधीही भलं होणार नाही, हे सांगणाऱ्या ‘दैव’ची नेमकी कथा काय? भक्तांची त्याच्यावर असणारी दृढ श्रध्दा, निसर्गाशी माणसाला जोडून ठेवणाऱ्या या दैवसाठी ‘कोला’ करणारा त्याचा निष्ठावंत भक्त या सगळ्याच गोष्टींबदद्ल ‘कांतारा’ने कुतूहल निर्माण केलं होतं. आता त्याचा प्रीक्वल किंवा पूर्वकथा सांगण्यासाठी म्हणून ऋषभ शेट्टीने ज्या ‘कांतारा : अ लीजंड – चॅप्टर १’चा घाट घातला आहे, तो पहिल्याइतकाच उत्तम दृश्यानुभव देणारा असला तरी पुराणकथेच्या पसाऱ्यात चित्रपटाचा खरा जीवच हरवून गेला आहे.
‘कांतारा’मधून लेखक – दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी पंजूर्ली या देवाची आणि गुलिगाची ओळख करून दिली. जंगलाचं आणि तिथल्या माणसांचं रक्षण करणाऱ्या क्षेत्रपालाची मूळ कथा नव्या चित्रपटात पाहायला मिळेल, असं चित्रपटाच्या प्रोमोमधून वाटत होतं. अर्थात, हा ‘दैव’चा आणि जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या गोष्टीचा एक धागा सोडला तर ‘कांतारा : अ लीजंड – चॅप्टर १’ या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. अर्थात, हा पहिला भाग असल्याचं शीर्षकातच स्पष्ट केलं असल्याने सगळ्याच गोष्टींची उकल यात होणार नाही याची माहिती असली तरी संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर लेखक – दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे हेच लक्षात येत नाही. यावेळी चित्रपट बऱ्यापैकी कित्येक शतकांपूर्वीच्या काळात घडतो. अर्थात, इथे राजे-रजवाडे आहेत. मसाल्याच्या व्यापाराचा संदर्भही आहे. पोर्तुगालमधून येणारे व्यापारी, अरबांना गुलाम म्हणून विकली जाणारी गोरगरीब माणसं हे संदर्भ इथे आहेत.
‘कांतारा’ म्हणजेच घनदाट जंगल आणि त्यात दडलेली ही मसाला वनस्पतीची संपत्ती यावर आपलं नियंत्रण असावं म्हणून धडपडणारा बांगराचा राजा कांतारातील आदिवासींवर हल्ला करतो. त्याला कांताराचा देव यमसदनी धाडतो. वडिलांचा डोळ्यासमोर घडलेला मृत्यू पाहून थरारलेला राजाचा लहानगा मुलगा काळी जादू करणाऱ्या कडपा आदिवासींच्या मदतीने पुन्हा आपल्या राज्यात परततो. वरवर शांत वाटणाऱ्या राजाच्या मनात सूडाची आग धूमसते आहे. इकडे कांतारामध्ये लहानाचा मोठा झालेला धाडसी, प्रत्येक कौशल्यात वाकबगार असलेला बेरमे आणि त्याचे सहकारी पहिल्यांदाच बांगरामध्ये शिरतात. तिथलं नागरीकरण पाहून हरखून गेलेला बेरमे कांतारामध्ये येऊन आपल्या कबिल्यालाही शेती करणं, जलसिंचन आदी गोष्टी शिकवू पाहतो. या नादात बांगरा आणि कांतारामध्ये असलेली, ‘दैव’च्या भयाने का होईना आखलेली सीमारेषा पुसट होत जाते. बांगराकडून पुन्हा एकदा कांतारावर जीवघेणा हल्ला होतो, यावेळी मात्र आपल्या कबिल्याला वाचवण्यासाठी बेरमेला ‘दैव’ची मदत सहज मिळत नाही. धर्म-अधर्म, दैवी आणि सैतानी शक्तींचा हा रणसंग्राम चित्तथरारक पध्दतीने दिग्दर्शकाने नव्या चित्रपटात रंगवला आहे.
एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतो तेव्हा निश्चित असे काही संदर्भ जोडलेले असले तर प्रेक्षक त्यात अधिक गुंतून राहतो. ‘कांतारा’मधल्या संकल्पना पंजूर्ली देव, गुलिगा हा रक्षक देव या चित्रपटातून उलगडतील ही अपेक्षा पूर्ण होत नाही, उलट आपण आणखी एका वेगळ्याच कथेत गुंतून पडतो. शेवटी मात्र गुलिगाचे अवतार आणि ‘व्हा…’ची आरोळी पुन्हा एकदा ‘कांतारा’ची आठवण करून देतात. ‘कांतारा : चॅप्टर १’ हा चित्रपट स्वतंत्रपणे पाहता येईल इतका तो वेगळा आहे. स्वत: ऋषभ शेट्टी हा कोला प्रथा मानणाऱ्या प्रदेशात, समाजात वाढलेला आहे. तो ज्या भागात लहानाचा मोठा झाला त्याच भागात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. शिवाय, त्याने स्वत: ‘यक्षगण’ या लोककलाप्रकारात काम केलेलं असल्याने गुलिगाच्या अवतारात तो ज्या सहजतेने शिरतो, त्यानंतर बदलणारी त्याची देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव हे सगळं तो ज्या तन्मयतेने साकारतो, त्याला तोड नाही.
जंगल आणि दैवी शक्ती, त्याचं गूढ, शतकांपूर्वीची काल्पनिक कथा रंगवण्यासाठीची दृश्यमांडणी, छायाचित्रण, व्हीएफएक्सचा अचूक वापर या सगळ्या जमेच्या बाजू ‘कांतारा : चॅप्टर १’मध्येही आहेत. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना धरून ठेवत असला तरी जवळपास तीन तासांच्या या चित्रपटात नको तितकी रंजक वळणं आणि न संपणाऱ्या लढाया यात कथानक उगाचच ताणलं गेलं आहे. बरं या सगळ्याच कथांचा संदर्भ आणि काळ पाहता आजच्या वास्तवाशी त्याचा सूतराम संबंध नसल्याने मनोरंजना पलिकडे हाती फार काही लागत नाही. ‘कांतारा’मध्ये असलेला वास्तव कथेचा धागाच या चित्रपटात नसल्याने केवळ खर्चिक मसाला मनोरंजन यापलिकडे चित्रपट पोहोचत नाही.कांतारा : अ लीजंड – चॅप्टर १दिग्दर्शक – ऋषभ शेट्टीकलाकार – ऋषभ शेट्टी, जयराम, रुक्मिणी वसंत, गुलशन देवियाह, प्रमोद शेट्टी.