‘कसाबला फाशी दिली, तुला कळलं का’, अशी विचारणा कार्यालयातील एका सहकाऱ्याने सकाळी फोनवरून केली आणि काय करावे हे थोडा वेळ कळेनासे झाले. त्यानंतर लगेचच ‘कसाबच्या कोणकोणत्या बातम्या तू देणार’ याबाबत वरिष्ठांकडून विचारणा होऊ लागली. प्रामुख्याने खटल्यादरम्यानच्या कसाबच्या वर्तनाबाबत तू काही देशील का, असे विचारण्यात आले. ‘तू कसाब खटला कव्हर केला आहेस’, हे ऐकून-ऐकून आणि कसाबच्या बातम्या करून खरे तर चांगलाच कंटाळा आला होता. पण त्याला फाशी दिल्याचे वृत्त कानावर थडकल्यानंतर कसाबविरुद्धचा खटला आपल्या ‘करिअर’मधील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असल्याची जाणीव झाली. त्याच वेळेला ‘चला, संपला एकदा कसाब चॅप्टर’ या कल्पनेने सुटकेची एक भावनाही मनाला स्पर्शून गेली.
या खटल्यादरम्यान सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद काय सुरू आहे यापेक्षा कसाब काय करतो याकडेच सगळ्यांचे लक्ष असे. ‘तो बोलला की बातमी’ हे जणू समीकरणच झाले होते. तोही उगाचच काहीही बोलत असे. त्याच्या त्या ‘नौटंकी’वरून सरकारी वकील आणि न्यायाधीशही त्याची चेष्टामस्करी करीत असत. सुरुवातीला स्वत:ला निरागस ‘बाळ’ म्हणवून घेणारा कसाब, वृत्तांकनासाठी न्यायालयात आलेले पत्रकार म्हणजे परग्रहाहून आलेले जीव आहेत या आविर्भात त्यांच्याकडे पाहणारा कसाब, नंतर नंतर त्यांच्याकडे पाहून माकडचेष्टा करणारा कसाब, त्याचे नाटकी रडणे, अचानक उठून ‘मुझे मेरा गुनाह कबूल करना है’, असं बोलून सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडणारा कसाब, त्यावरून ‘घूमजाव’ करीत फिल्मी कहाणी सांगणारा धूर्त कसाब आणि फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर केवळ ‘शुक्रिया’ म्हणून तेथून निघून जाणारा कसाब, अशी त्याची अनेक रूपे चांगलीच लक्षात राहिली आहेत.
खरे सांगायचे तर पहिल्या दिवशी न्यायालयात वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना तो कसा दिसतो, कसा बोलतो याचविषयी जास्त उत्सुकता होती. परंतु त्याला पाहिल्यावर याने हे कृत्य केले, यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. नंतर मात्र ही गर्दी कमी होत गेली. पण कसाबचे चाळे किंवा धूर्तपणा काही थांबला नाही. त्यामुळे खरा कसाब नेमका काय आहे हे कधीच कळले नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण त्याचा धूर्तपणा आणि म्होरक्यांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा त्याच्या वागण्यातून वारंवार प्रत्यय येत होता.
त्याने जेव्हा सुरुवातीला कबुलीजबाब देत त्याच्या दहशतवादी बनण्यामागील करुण कहाणी सांगितली होती, त्या वेळेस सगळ्यांच्या मनात थोडय़ाअधिक प्रमाणात त्याच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली होती. आपण केवळ ‘प्यादे’ होतो, आपल्या गरिबीचा फायदा घेऊन आपल्या धार्मिक भावना भडकवण्यात आल्याचे आणि केवळ सव्वा लाख रुपयांसाठी आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितल्यावर ‘तो खरं बोलत असावा’, असे सगळ्यांना वाटले. मात्र गुन्ह्य़ाची कबुली देताना, विशेष करून घटनाक्रम सांगताना कसाबने आपण काहीच केले नाही, केले ते सगळे अबू इस्माइलने, असे सांगितले तेव्हा त्याचा धूर्तपणा लक्षात आला.
आरोपीच्या पिंजऱ्यात कसाब सुरुवातीला बसायचा. त्याच्या शेजारी फईम अन्सारी आणि नंतर सबाउद्दिन शेख हे सहआरोपी बसायचे. अनेकदा कंटाळा आला की कसाब अक्षरश: मान खाली घालून झोपायचा. एकदा तर तो कानात कापसाचे बोळे घालून आला होता. न्यायाधीशांनी त्याच्याकडे त्याबाबत विचारणा केली त्या वेळेस विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे बोलणे ऐकवत नाही, असे त्याने सांगितले होते.
ज्या दिवशी त्याचा आरोपी म्हणून जबाब नोंदविण्यात येणार होता त्या वेळेस तो कबुलीजबाबाचा पुनरुच्चार करणार अशी अपेक्षा सगळे जण करत होते. मात्र ‘तो मी नव्हेच’ असे सांगत कसाबने ‘घूमजाव’ केले. आपण हीरो बनण्यासाठी मुंबईत आलो होतो आणि जुहू चौपाटीवर फिरत असताना पोलिसांनी आपल्याला अटक केली व नंतर दहशतवादी बनविले, असा दावा त्याने केल्यानंतर कसाब काय ‘चीज’ आहे हे सगळ्यांना कळले. शेवटपर्यंत आपल्याकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा आटापिटा सुरू होता. शिक्षा सुनावण्याच्या दिवशी मात्र तो दिवसभर शांत होता आणि शिक्षा सुनावण्यात आल्यावर केवळ ‘शुक्रिया’ म्हणत तेथून निघून गेला. त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्स्िंागद्वारे तो दिसे. त्या वेळेस त्याचा उद्दामपणा दिसून आला. एकदा तर तो कॅमेरावर थुंकून निघून गेला..    
कसाबचा खटला हा भारतीय न्याययंत्रणेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा खटला म्हणून इतिहासात नोंदला गेला आहे. त्याचप्रमाणे माझ्यासह अनेकांच्या पत्रकारितेच्या आयुष्यातही एक महत्त्वाचा कालखंड म्हणून कायमस्वरूपी वसला आहे. ‘क्रूरकर्मा’ कसाबचा अंत झाल्याबद्दल मनात समाधानाची भावना असतानाच एक महत्त्वाचा अध्याय आता कायमस्वरूपी संपल्याची, मनाला हुरहुर लावणारी भावनाही मनात घर करून राहिली आहे.