केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक २५ आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यावेळी कश्मिराने तिच्या या यशामागील रहस्यही आणि प्रवासही सांगितला. ती मंगळवारी (२३ मे) एबीपी माझाशी बोलत होती.

कश्मिरा संखे म्हणाली, “मी निकालाकडून काही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. मात्र, आशा नक्कीच होती. जेव्हा निकाल लागला तेव्हा काहीवेळ विश्वास बसत नव्हता. ही प्रोव्हिजनल लिस्ट नसून रँकर्स लिस्ट आहे ना याची मी खात्री करून घेतली, तेव्हा मला विश्वास बसला की माझा देशात २५ वा रँक आहे.”

“माझी आई मला किरण बेदींच्या बातम्यांची कात्रणं दाखवायची”

“लहानपणापासून मी यूपीएससीचं स्वप्न पाहिलं होतं. माझी आई मला किरण बेदींच्या बातम्यांची कात्रणं दाखवायची. तेव्हापासून नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याचा विचार होता. माझं पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. मी मुंबईतील शासकीय डेंटल कॉलेजमधून डेंटल सर्जरीमध्ये पदवी घेतली. पुढे डेंटिस्ट म्हणून काम करत असताना वाटलं की, मी नागरिकांच्या आरोग्यावर काम करते आहे, मात्र नागरी सेवेतून मी मोठ्या प्रमाणात काम करू शकते. तेव्हापासूनचा निश्चय आताही ठाम आहे,” असं कश्मिरा संखेने सांगितलं.

“माझा पर्यायी विषय ‘अँथ्रोपोलॉजी’ होता”

कश्मिरा संखे पुढे म्हणाले, “माझा पर्यायी विषय ‘अँथ्रोपोलॉजी’ होता. मी वैद्यकीय शिक्षण घेतलं असल्याने अँथ्रोपोलॉजीत अनेक विषयांची पुनरावृत्ती होते. मी जसजसा या विषयाचा अभ्यास करत गेले तसतसा मला हा विषय समाज आणि संस्कृतीबाबत अधिक महत्त्वाचा असल्याचं जाणवलं. माझा या विषयातील रस वाढत गेला आणि मी याच विषयाला माझा पर्यायी विषय म्हणून निवडलं.”

हेही वाचा : UPSC Result 2022 : नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, देशात आणि राज्यात मुलींचाच डंका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी २०२० पासून या परीक्षेसाठी तयारी सुरू केली”

“मी २०२० पासून या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. हा माझा तिसरा प्रयत्न होता. मागील दोन प्रयत्नात मी प्रिलीम परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. यावेळी सर्वच पातळ्यांवर मला यश मिळालं. माझं पहिलं प्राधान्य आयएएस आहे, दुसरं प्राधान्य आयएफएस आहे. मला महाराष्ट्रात काम करायला मिळालं तर आवडेल. कारण मला इथली भाषा आणि संस्कृती माहिती आहे,” असंही कश्मिराने नमूद केलं.