उपाहारगृह व्यावसायिकांची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : येत्या २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मुंबई २४ तास ’चे उपाहारगृह व्यावसायिकांच्या ‘आहार’ या संघटनेने स्वागत केले आहे. भाजपने या संकल्पनेला विरोध केलेला असताना भाजपचेच कार्यकर्ते असलेले निरंजन शेट्टी यांनी मात्र आहारच्या वतीने स्वागत केले आहे. इतकेच नाहीतर ही संकल्पना केवळ मॉल, थिएटर आणि मिल कम्पाऊंड पुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण मुंबईत लागू केली पाहिजे, असेही मत निरंजन शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

‘मुंबई २४ तास ’ सुरू होण्याआधीच त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होऊ  लागल्या आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना केवळ ‘गेटेड कम्युनिटी’ अर्थात ज्यांना स्वत:चे प्रवेशद्वार आहे, स्वत:ची सुरक्षा व्यवस्था आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशा आस्थापनांपुरतीच असेल. त्यामुळे सुरुवातीला नरिमन पॉइंट, काळा घोडा, लोअर परळ, बीकेसी अशा अनिवासी भागातील मॉल किंवा मिल कम्पाऊंडमधील दुकाने व उपाहारगृहे सुरू ठेवता येतील.

मॉलधारकांनी याबाबत ज्या बैठका घेतल्या त्यात काही मुद्दे पुढे आले आहेत. मुळात मुंबईत मॉल कमी संख्येने आहेत. जे आहेत ते दिवसादेखील फारसे चालत नाहीत. त्यामुळे त्यांना याचा किती फायदा होईल, याबद्दल शंका आहे. मॉलमधील एक-दोन दुकानदारच जर दुकान उघडे ठेवणार असतील तर त्यांच्यासाठी मॉल सुरू ठेवणे आम्हाला परवडणारे नाही, असाही पवित्रा काही मॉलधारकांनी घेतला आहे. त्यामुळे सुरुवातीला मॉलधारकही फक्त शनिवारी व रविवारी २४ तास खुले ठेवणार आहेत. त्यामुळे या योजनेचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही, असा दावा शेट्टी यांनी केला आहे. त्यापेक्षा संपूर्ण मुंबईतील लहान-मोठय़ा दुकानदारांनाही या योजनेत सामावून घेतले तर बाहेरगावाहून रात्री-अपरात्री येणारे पर्यटक, मुंबईकर यांना त्याचा लाभ होईल व खऱ्या अर्थाने रोजगार वाढेल, असेही शेट्टी यांचे म्हणणे आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर दुकाने उघडी राहिल्यास कायदा सुव्यवस्थेची समस्या उद्भवण्यापेक्षा कमी होईल, असेही मत त्यांनी मांडले.

‘मुंबई २४ तास ’ म्हटले की पब आणि बार हेच लक्षात घेतले जाते. मात्र कायद्याद्वारे मद्य विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. ठरावीक वेळेनंतर मद्य विक्री केल्यास त्यांचा परवाना रद्द होऊ  शकतो. त्यामुळे हा मुद्दाही निर्थक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep the whole mumbai open for 24 hours demand for restaurant owners zws
First published on: 24-01-2020 at 03:05 IST