मुंबई : केईएम, नायर आणि शीव या रुग्णालयांमधील सीटी स्कॅन यंत्रे जुनी झाली असून, अनेक रुग्णांना खासगी रुग्णालये अथवा केंद्रांमध्ये जाऊन सीटी स्कॅन करावे लागत आहे. परिणामी गरीब रुग्णांना अर्थिक झळ सोसावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने तिन्ही रुग्णालयांमध्ये अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अलिकडेच झालेल्या एका बैठकीमध्ये नवी सीटी स्कॅन यंत्रांच्या खरेदीसाठी ३९ कोटी रुपयांचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. येत्या तीन – चार महिन्यांमध्ये या तिन्ही रुग्णालयांमध्ये अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रे बसविण्यात येण्याची शक्यता असून, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात दररोज चार ते पाच हजार रुग्ण उपचारासाठी, तर अनेक रुग्ण अपघात विभागात येत असतात. यापैकी सुमारे १०० ते १२० हून अधिक रुग्णांना सीटी स्कॅनची गरज भासते. त्यामुळे या तिन्ही रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅनसाठी बरीच मोठी प्रतीक्षायादी असते. केईएम रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन करण्यासाठी रुग्णांना दोन महिने थांबावे लागते. मात्र अनेकदा सीटी स्कॅन तातडीने करणे आवश्यक असल्याने रुग्णांना खासगी प्रयोगशाळेतून सीटी स्कॅन करावे लागते. परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागताे. रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन केईएम, नायर आणि शीव रुग्णालयांमध्ये नवी अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रे उपलब्ध करण्याबाबत नुकतेच कार्यादेश देण्यात आले आहेत. नव्याने खरेदी करण्यात येणारी ही यंत्रे देशातील सर्वाधिक अद्ययावत यंत्रे असणार आहेत. यामुळे अधिक सूक्ष्म बाबींचे निरिक्षण करणे शक्य होणार आहे. ही अद्ययावत यंत्रे पुढील तीन – चार महिन्यांमध्ये या तिन्ही रुग्णालयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> वडाळ्यातील बेस्टच्या विद्युत उपकेंद्राला आग
देशातील अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रे
केईएम, नायर व शीव रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात येणारी तिन्ही यंत्रे ही देशातील आतापर्यंतची सर्वाधिक अद्ययावत यंत्रे आहेत. जपानच्या कॅनन कंपनीची ही यंत्रे असून, कॅनन प्रायमा ॲक्विलियम या प्रकारातील ही यंत्रे आहेत. आतापर्यंतच्या यंत्रांमध्ये १२० स्लाईस असायच्या, मात्र नव्या यंत्रांमध्ये १६० स्लाईस असणार आहे. यामुळे हृदय, यकृत, स्वादूपिंड, मेंदू यातील २ मिमीपर्यंतचा सुक्ष्म ट्युमर दिसणार आहे. तसेच शरीरातील रक्त व पू यातील फरक लगेच निदर्शनास येणार आहे. छोट्यातील छोटी बाब अचूक हेरता येणार असल्याने रुग्णांवर उपचार करणे अधिक सोपे होणार आहे.
एका यंत्राची किंमत १८ कोटी रुपये
केईम, नायर व शीव रुग्णालयांसाठी सीटी स्कॅन यंत्रे खरेदी करण्यासाठी महानगरपालिकेने ३९ कोटी रुपयांचे कार्यादेश जारी केले आहेत. एका सीटी स्कॅनची किंमत १८ कोटी रुपये इतकी आहे.
मुंबई महानगरपालिका खरेदी करीत असलेली सीटी स्कॅन यंत्रे देशातील अद्ययावत यंत्रे असल्यामुळे रुग्णांची अधिक सूक्ष्म तपासणी करणे शक्य होणार आहे. नवीन यंत्रामुळे रुग्णालयांच्या प्रतीक्षायादीतील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल आणि रुग्णांना दिलासा मिळेल.