मुंबई: नवीन पादचारीपूल, सरकते जिने, आकाशमार्गिका (स्कायवॉक) यासह अनेक विविध सुविधा उपलब्ध करून पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकाचा चेहरामोहराच बदलण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) घेतला आहे. मे महिन्यापासून या कामांना सुरुवात केली असून मार्च २०२४ पर्यंत ही काम पूर्ण करण्याचा एमआरव्हीसीचा मानस आहे.

पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकात प्रवाशांची वर्दळ असते. या स्थानकात धीम्या लोकलसह हार्बर मार्गावरील लोकलही थांबतात. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दररोज ५२ हजारपेक्षा अधिक प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वेच्या मदतीने खार स्थानकात विविध कामे हाती घेतली आहेत.

एमआरव्हीसीने एमयुटीपी ३ ए अंतर्गंत १९ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी खार स्थानकातील कामे हाती घेण्यात आली आहेत. अन्य स्थानकांतील कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मे २०२२ पासून खार स्थानक व हद्दीतील विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या स्थानकात नवीन होम प्लॅटफॉर्मही उभारण्यात येत आहे. या स्थानकांतील सर्व पादचारीपूल परस्परांना जोडण्यात येणार असून या पादचारीपुलांवरुन थेट फलाटावर जाता येईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.  या स्थानकात सध्या एक सरकता जिना आहे. या प्रकल्पाअंतर्गत तेथे आणखी चार सरकते जिनेही उभारण्यात येणार आहेत. तर तीन ‌‌उद्वाहकही उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

खार स्थानकात या सुविधा होणार

– स्थानकाच्या पश्चिमेला दहा मीटर रुंदीचा डेक होणार असून तेथे तिकीट खिडकी असेल.

– आणखी एक २२.५० मीटर रुंदीचा डेक उभारण्यात येणार असून तो स्थानकातील सर्व पादचारीपुलांना जोडण्यात येणार आहे.

– खार स्थानकात मध्यभागी पादचारीपूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सात मीटर रुंदीची आकाशमार्गिका