लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः शेअर बाजारातील व्यावसायासाठी बँकेत चालू (करंट) खाते उघडून न दिल्यामुळे संतापलेल्या चौघांनी २३ वर्षांच्या तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. याप्रकरणी तीन अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा मुख्य सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. तुषार चाकोरकर, दिलखुश तेली आणि पवन कीर अशी या तिघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध अपहरणासह शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळचा बिहारमधील रहिवासी असलेला सोनू संजय सिंहा (२३) सध्या त्याच्या मित्रासोबत गोरेगाव येथील बालाजी चाळीत वास्तव्यास आहे. त्याची व्ही. आर. सर्व्हिस एचआर नावाची प्लेसमेंट कंपनी असून या कंपनीचे कार्यालय गोरेगावमधील बांगुरनगर मेट्रो स्थानकाजवळ आहे. फेब्रुवारी महिन्यांत त्याच्या कार्यालयात तुषार आणि सौरभ आले होते. या दोघांनाही शेअर बाजारात व्यवसाय सुरू करायचा होता. मात्र मुंबईचे रहिवासी नसल्याने त्यांना बँकेत चालू खाते उघडता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सोनूला त्यांच्यासाठी चालू खाते उघडून देण्याची विनंती केली. तसेच त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्याचे मान्य केले. त्यामुळे सोनूने त्यांना त्याच्याच कंपनीच्या नावाने दोन चालू खाती उघडून दिली. दोन खाती उघडून दिल्यानंतरही ते दोघेही आणखी एक चालू खाते उघडून देण्यास त्याला सांगत होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने त्यांना नकार दिला.

आणखी वाचा-अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

६ एप्रिलला तुषारने त्याला प्लेसमेंट कामासाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ बोलाविले. त्यामुळे तो व त्याचा मित्र विकास रात्री १० वाजता तेथे गेले होते. यावेळी सौरभ आणि तुषारने त्याच्याशी चालू खाते उघडून देण्याबाबत वाद घातला. त्याला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्यासोबत इतर दोन तरुण होते. काही वेळानंतर या चौघांनी सोनूला एका मोटरीत बसवून त्याचे अपहरण केले. हा प्रकार तेथे उपस्थित नागरिकाच्या निदर्शनास आला. मात्र त्यांनी आमच्यात आर्थिक वाद आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या वादात पडू नका, अशी धमकी या चौघांनी नागरिकांना दिली. काही वेळानंतर ते चौघेही सोनूला घेऊन दहिसरच्या दिशेने निघून गेले होते. दहिसर चेकनाका आल्यानंतर सोनूने आरडाओरड केल्याने तेथे काही वाहतूक पोलीस आले. त्यांनी त्यांची मोटरगाडी अडविण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात सौरभ तेथून पळून गेला, तर इतर तिघांना पळून जाताना वाहतूक पोलिसांनी पकडले.