अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणानंतर आमने-सामने आलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोपांमध्ये आज आणखीन एक भर पडली. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्विट केले. वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केलाय. दरम्यान समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊन असं म्हटलं आहे. मात्र असं असतानाच आता या प्रकरणावरुन समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनेही पती समीर यांच्यासोबतच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत मलिक यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

एकमेकांना वरमाला घालताना आणि नंतर आपल्या पालकांच्या साक्षीने मंदिरामध्ये विवाह करतानाचे दोन फोटो क्रांतीने पोस्ट केलेत. या फोटोंना कॅप्शन देताना ती म्हणते, “मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही कोणत्याही धर्मामध्ये धर्मांतर केलेलं नाही. आम्हाला सर्व धर्मांचा सन्मान आहे. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केलं होतं. माझ्या सासुबाई आज हयात नाहीत. समीरचं आधीचं लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं. त्याने २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ साली लग्न केलं.”

समीर यांचं पहिलं लग्न…
२००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत समीवर वानखेडे यांनी नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत समीर आणि शबाना या दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती रेडकरशी विवाह केला, असंही समीर म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडेंचं स्पष्टीकरण…
नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागल्यानंतर आता वानखेडेंनीही यावर स्पष्टीकरण दिलंय. मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.