दोन वर्षांतील कामांसाठी महापालिकेला चार हजार कोटी रुपयांची गरज; तिजोरीत मात्र खडखडाट

प्रसाद रावकर
मुंबई : करोना संसर्गामुळे वाढलेला खर्च आणि उत्पन्नात झालेली घट याचा मोठा फटका मुंबईतील रस्ते दुरुस्तीला बसला आहे. गेल्या दोन वर्षांत सुरू झालेली आणि सध्या हाती घेतलेली रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेला तब्बल चार हजारांहून अधिक निधीची गरज आहे. तिजोरीतील खडखडाटामुळे पालिकेला रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करता आलेला नाही. असे असताना पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक मात्र आपापल्या विभागांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा आग्रह धरू लागले आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डय़ांमुळे रस्त्यांची दुर्दशा होते. खड्डेमय रस्त्यांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत दरवर्षी खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पालिकेच्या रस्ते विभागामार्फत हाती घेतली जातात. काही रस्त्यांच्या मध्यवर्ती यंत्रणेमार्फत, तर काही रस्त्यांची विभाग कार्यालयाच्या पातळीवर दुरुस्ती करण्यात येते. गेल्या दोन वर्षांमध्ये पालिकेने मोठय़ा प्रमाणावर रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. मात्र मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि पालिकेची धावपळ उडाली. तात्काळ टाळेबंदी आणि संचारबंदी लागू झाली. त्यामुळे संपूर्ण कारभार ठप्प झाला.

टाळेबंदीमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आणि त्याचा परिणाम पालिकेच्या महसुलावर झाला. एकीकडे खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र घसरू लागले. याचा फटका पालिकेच्या विकासकामांना बसू लागला आहे.

गेल्या दोन वर्षांत पालिकेने हाती घेतलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी आजघडीला चार हजार १६३ कोटी रुपयांची गरज आहे. मात्र मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकासकामे, नागरी सुविधांसह करोनाविषयक कामांवर मोठा निधी खर्च होत आहे. मात्र त्याच वेळी वाढलेला खर्च आणि देण्यात आलेल्या सवलतींमुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण आला आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे.

निधी उपलब्धता अशक्य

महापालिकेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी एक हजार २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात रस्ते दुरुस्तीसाठी चार हजार १६३ कोटी रुपयांची गरज असल्याचे लेखा परीक्षण विभागाने प्रशासनाला सादर केलेल्या विवरणपत्रात नमूद केले आहे. चालू वर्षांतील तरतूद लक्षात घेता दोन हजार ९०३ कोटी रुपयांची गरज आहे. सध्याची आर्थिक स्थिती आणि करोनाविषयक कामे लक्षात घेता इतका निधी रस्त्यांच्या कामांसाठी उपलब्ध करणे प्रशासनाला शक्य नाही. पालिकेच्या पुढील आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात एक हजार ४२० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

नगरसेवकांकडून सातत्याने मागणी

नगरसेवकांकडून रस्ते दुरुस्तीची मागणी सातत्याने वाढत आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची दोन हजार कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागविण्याचा हट्ट नगरसेवक करीत आहेत. त्यासाठी पालिकेच्या २०२२-२१ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात ३७०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, तरच नगरसेवकांच्या मागणीनुसार रस्ते कामे हाती घेता येऊ शकतील, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.