मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी सामाजिक न्याय विभागाचा ४०० कोटींचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यामुळेच त्या खात्याचा पहिला क्रमांक आला, असा टोमणा शिवसेना (शिंदे) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लगावला.
१०० दिवसांच्या कार्यक्रमात आदिती तटकरे यांच्या खात्याचा पहिला क्रमांक आला असला तरी तो अन्य खात्यांचा निधी वळवून, अशी खोचक टीका शिरसाट यांनी केल्याने रविवारी महायुती सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमधील धुसफुस चव्हाट्यावर आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभात एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्यानंतर आता शिरसाट यांनी पुन्हा राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. त्यामुळे भाजपच्या दोन्ही सहकारी पक्षांतील संबंध अधिकच ताणले गेल्याचे स्पष्ट होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी, तर आदिवासी विकास विभागाचे ३३५ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचा निधी परस्पर हस्तांतरित करण्यात आल्याने शिरसाट चांगलेच संतप्त झाले आहेत.
१०० दिवसाच्या अभियानात सामाजिक न्याय विभागाचा कुठेही उल्लेख नाही. कारण आम्हाला काम करण्याची संधीच मिळाली नाही. मग उल्लेख तरी कसा होणार, असा सवाल करताना हे खातेच बंद करून टाका असा टोलाही शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लगावला. ‘‘पाय तोडायचे आणि पळ म्हणायचे हे कसे शक्य होणार? हा माझ्यावर अन्याय असून खात्याकडे निधीच नसेल तर आम्ही नेमके काय काम करतोय हे जनतेला आणि सरकारला तरी कळणार कसे,’’ असा सवालही त्यांनी केला. शिंदे व अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेहमीच कटुता राहिली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही शिंदे व पवार दोघेही माघार घेण्यास तयार नाहीत. हा तिढा सोडविण्यात भाजपचे उच्चपदस्थ पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.
तेव्हा कृष्णा खोऱ्यासाठी निधी
काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना सामाजिक न्याय विभागाचा निधी राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कृष्णा खोरे मंडळाकडे वर्ग करण्यात आला होता. अनुसूचित जातीचे लोक कृष्णा खोऱ्यात राहतात, असा युक्तिवाद तेव्हा राष्ट्रवादीने केला होता. आताही अनुसूचित जातीच्या बहिणींना लाभ देण्याकरिता निधी वर्ग करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात येत आहे.
‘मला तर बंगलाही नाही’
बदलापूर : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी बदलापुरात स्वत:वर झालेल्या अन्यायाबद्दल मिश्कील भाष्य केले. ‘तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यावर किती अन्याय झाला आहे. मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही’, असे वक्तव्य शिरसाट यांनी केले. ‘पण मी ७२व्या मजल्यावर राहतो आणि आज इथून झोपडपट्टी बघतो, ज्या झोपडपट्टीतून मी आधी मोठ्या इमारती पाहायचो’, असा टोलही त्यांनी लगावला.
सामूहिक निर्णय – बावनकुळे
पुणे : सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवल्यामुळे शिरसाट यांनी व्यक्त केलेल्या नाराजीसंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पुणे येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. ‘‘एखादी योजना राज्य म्हणून चालू केल्यावर ती राज्याने चालवायची असते. विभाग वेगवेगळे असले, तरी सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात. सर्वच समाजांतील बहिणी लाडक्या बहिणी आहेत,’’ असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवार वित्तमंत्री असताना निधी मिळत नसल्यानेच आम्ही महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये गेलो. आता महायुतीतही तेच होत आहे. अजित पवारांनी असा परस्पर निधी वर्ग करायला नको होता. – संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री
अजितदादांचे मौन
संजय शिरसाट यांच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिला. छत्रपती संभाजीनगर येथे विविध कार्यक्रमांसाठी आले असता पवार यांना शिरसाट यांच्या आरोपांबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी अधिक बोलणे टाळले. समाजकल्याण खाते बंद करण्याच्या शिरसाट यांच्या खोचक सल्ल्यावर मुख्यमंत्री विचार करतील, असे एका वाक्यात उत्तर पवार यांनी दिले.