मुंबई : स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि स्त्रियांनी स्त्रियांसाठी घडविलेला ‘लग्न आणि बरंच काही’ हा नवीन मराठी चित्रपट येत्या महिला दिनाच्या म्हणजेच मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा मराठी चित्रपटसृष्टीतील आगळावेगळा प्रयोग असून चित्रपटाच्या कलात्मक ते तांत्रिक अशा सर्वच जबाबदाऱ्या स्त्रियांकडून सांभाळल्या जाणार आहेत. स्त्रियांच्या जीवनातील सूक्ष्म भावना, अनुभव, स्वप्ने आणि संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपटाचे सर्व टप्पे स्त्रियांच्या कुशल हातांनी पार पाडले जाणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी करणार असून, निर्मितीची जबाबदारी डॉ. संजना सुरेश पै आणि अंजली नान्नजकर सांभाळणार आहेत. कथालेखन यशश्री मसुरकर, छायाचित्रण स्मिता निर्मल, संगीत दिग्दर्शन वैशाली सामंत,
संकलन भक्ती मायाळू, प्रोडक्शन डिझाईन मुग्धा कुलकर्णी, ब्युटी स्टायलिंग सुप्रिया शिंदे, प्रसिद्धी व जनसंपर्क प्रज्ञा सुमती शेट्टी आणि डिजिटल मार्केटिंग अश्मीकी टिळेकर करणार आहेत. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि शर्मिला शिंदे महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रत्येक पायरीवर महिलांचाच ठसा असलेला हा आगळावेगळा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
लग्नानंतरचे आयुष्य मुलीसाठी केवळ नव्या जबाबदाऱ्यांचे दार उघडत नाही, तर ते तिच्या जीवनप्रवासातील एक नवा अध्याय, नवी वाटचाल आणि नातेसंबंधांच्या नव्या ओळखींचा आरंभ ठरतो. हे सर्व ‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असूनहा चित्रपट आगामी महिला दिनाच्या महिन्यात म्हणजेच मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.