मुंबई: अंमलीपदार्थ निर्मिती करणारा मुख्य आरोपी ललित पाटीलसह चार आरोपींना न्यायालयाने सोमवारी २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साकीनाका पोलिसांच्या तपासात चालक सचिन वाघने ललित पाटीलच्या सांगण्यावरून मोठ्याप्रमाणात मेफेड्रॉनची(एमडी विल्हेवाट लावली आहे.

आरोपी ललित पाटील, सचिन वाघ, शिवाजी शिंदे व रोहित चौधरी यांना साकीनाका पोलिसांनी सोमवारी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी मोठ्याप्रमाणात अंमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात आले होता. आरोपी सचिन वाघने मोठ्याप्रमाणात एमडी साठ्याची विल्हेवाट लावली. वाघने ललित पाटीलच्या सांगण्यावरून तसे केल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला. या साठ्याची विल्हेवाट लावली किंवा तो लपवून ठेवला आहे, याबाबत साकीनाका पोलीस तपास करत आहेत. याशिवाय आरोपींचे आणखी एमडी बनवण्याचे कारखाने असल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा >>>मुंबईतल्या शीव रुग्णालयात यकृताची बायपास!

याप्रकरणी ललित पाटील व भूषण पाटील यांची एकमेकांसमोर चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी भूषण पाटीलचाही लवकरच ताबा घेण्यात येणार आहे. नाशिकमधील कारखान्याचा करार कांबळे नावाच्या व्यक्तीद्वारे करण्यात आला होता. तसेच याशिवाय याप्रकरणातील आरोपी भूषण पाटील यांने यादव नावाच्या व्यक्तीला अनेक वेळा गुगलच्या माध्यमातून पैसे पाठविले आहेत. तसेच कांबळे नावाच्या व्यक्तीनेच यादवला हा कारखाना चालवण्यास दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे पाटील बंधु या दोघांचे नाव पुढे करून स्वतः हा कारखाना चालवत होते. कांबळे यांना या कारखान्याबाबत माहिती होती का नाही, याबाबत साकीनाका पोलीस तपास करत आहेत. हा सर्व प्रकार ललित पाटीलच्या सांगण्यावरून चालू होता, अशी माहितीही तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सर्व चार आरोपींना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.