दोन महिन्यांत दुपटीने वाढ

पावसाळा सुरू होताच मुंबईत डेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांचे प्रमाण वाढू लागले आहे. १ मे ते २७ जून या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईत ३३०६ ठिकाणी डेंग्यू आजाराचा फैलाव करणाऱ्या एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या सापडल्या आहेत, तर १२८३ ठिकाणी मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या एनॉफिलीस स्टिफेन्सी या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत.

पावसाच्या आगमनाबरोबरच डासांमुळे वाढणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्याकरिता पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून प्रयत्न केले जातात. १ जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत मुंबईत १९९७ ठिकाणी एडिस इजिप्ती डासाच्या अळ्या सापडल्या होत्या, तर मलेरिया आजाराचा फैलाव करणाऱ्या डासांच्या अळ्या ५७७ ठिकाणी आढळल्या होत्या. मात्र या चार महिन्यांच्या तुलनेत मे व जून या दोन महिन्यांतच डेंग्यू व मलेरियाच्या डासांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

[jwplayer I68shQBX]

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे या चार महिन्यांत डेंग्यू व मलेरिया पसरविणाऱ्या डासांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या या डासांची उत्पत्ती साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. घरातील कुडय़ांखाली ठेवलेल्या ताटल्या, पाण्याच्या टाक्या, मनी व बांबू प्लॅन्ट्स, कूलर, फ्लॉवरपॉट यामध्ये पाणी साचून राहिलेले पाणी डासांच्या फैलावाला कारणीभूत ठरते. म्हणून पालिकेच्या कीटकनाशक विभागाने गेल्या दोन महिन्यांत २१ लाख घरांना भेटी दिल्या. १ जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ३३ लाख ३ हजार ८८२ घरांना भेटी देण्यात आल्या होत्या. ज्या घरांमध्ये डेंग्यू व मलेरिया डासांच्या अळ्या सापडल्या त्या नष्ट करण्यात आल्या.

गेल्या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मुंबईत जास्त होती. जूनमध्येच ४८ जणांना डेंग्यूची बाधा झाली होती. मात्र या वर्षी जूनपर्यंत मुंबईत डेंग्यूची रुग्णसंख्या १४ इतकी असली तरी ही संख्या वाढू नये यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

घरांमधील साचलेल्या पाण्याव्यतिरिक्त रस्ते व इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणीही डेंग्यू व मलेरियाच्या अळ्या सापडतात. येथे काम करणारा कामगार वर्ग या परिसरातच तात्पुरती निवासस्थाने उभारून राहत असतो. त्यांना डेंग्यू किंवा मलेरिया या आजारांची बाधा होऊ नये यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांना मच्छरदाणी पुरविणे आवश्यक असते. व्यावसायिकाने याकडे दुर्लक्ष केल्यास आणि कामगारांना डेंग्यू किंवा मलेरिया या आजारांची लागण झाल्यास व्यावसायिकांना शिक्षा होऊ  शकते, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.