मुंबई : राहुरी येथील राजाराम आणि मनिषा आढाव या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयातील वकील संघटनेसह कनिष्ठ न्यायालयांतील वकिलांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले आहे. याशिवाय, या हत्येच्या निषेधार्थ आणि वकील संरक्षण कायद्यासाठी वकील संघटनेकडून शुक्रवारी आझाद मैदानातही आंदोलन केले जाणार आहे. नंतर, मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.
मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय वकील संघटनेची गुरूवारी दुपारी विशेष बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला संघटनेच्या सदस्यांसह सर्व समिती सदस्य उपस्थित होते. त्यावेळी आढाव दाम्पत्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कामापासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, त्याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. या ठरावाची प्रत शहर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांसह अन्य न्यायाधीशांना देण्यात आली. त्यात, शुक्रवारी होणाऱ्या प्रकरणांच्या सुनावणीला वकील आणि पक्षकार उपस्थित न राहिल्यास प्रतिकूल आदेश देऊ नयेत.अशी विनंती करण्यात आली आहे. या आधी, आझाद मैदानातील आंदोलन आणि मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा >>> मुंबईतली रस्त्यांची कामे रेंगाळणार? कंत्राटं रद्द केल्यानंतर प्रशासनाने पुन्हा निविदा मागवल्या
मुंबई महानगरदंडाधिकाऱी न्यायालय वकील संघटनेनेही अशाच प्रकारचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावानुसार, मुख्य व अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयांतील वकील शुक्रवारी कामापासून दूर राहणार आहेत. वकिली शुल्कावरून अशिलाकडूनच आढाव दाम्पत्याचे हत्याकांड घडवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीनजणांना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.