मुंबई : अमली पदार्थ प्रकरणातून आर्यन खान याच्या सुटकेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेता शाहरूख खान यालाही आरोपी करण्याचे आदेश द्या, अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. शाहरूख याने लाच दिल्याचा दावा करून याचिकाकर्त्यांने ही मागणी केली आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, लाच घेणाऱ्यासह लाच देणाराही दोषी असतो. शिवाय लाच दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यास संबंधित आरोपी पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असतो. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, वानखेडे यांनी स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याच्यामार्फत शाहरूख याच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली होती. शाहरूख याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) याबाबत माहिती न देताच लाचेची रक्कम दिल्याचाही सीबीआयचा आरोप आहे. त्यामुळे कायद्यानुसार, शाहरूख यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात यावे, असे आदेश देण्याची मागणी वकील राशीद खान यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. तसेच शाहरूख याची नार्को, ब्रेन मॅपिंगसह खोटे पकडणारी चाचणी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉर्डिलिया क्रुझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन खान याला वानखेडे यांच्या पथकाने अटक केली होती. मात्र, आर्यन याला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने एनसीबीच्या तपासावर बोट ठेवले होते. त्यानंतर वानखेडे यांच्यावरील कारवाईबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. वानखेडे यांनी शाहरूख याच्याकडून लाच घेतल्याच्या आरोपाच्या चौकशीसाठी एनसीबीने विशेष चौकशी समिती स्थापन केली. या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने वानखेडे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी वानखेडे यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.