मुंबई : मुसळधार पावसामुळे सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छतातून गळती होत असून या इमारतीच्या नूतनीकरणासाठी नुकतेच खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याची जोरदार चर्चा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.

पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या तीन मजली इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. डागडुजीच्या कामासाठी कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मजल्यावरील विविध विभाग व रुग्णांना अन्य मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या डागडुजीचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते. या तिसऱ्या मजल्यावर शस्त्रकिया विभाग, महिला अस्थिव्यंग रुग्णकक्ष, महिला शस्त्रक्रिया रुग्णकक्ष, वैद्यकीय रुग्णकक्ष असे महत्त्वाचे विभाग आहेत. मंगळवारी कोसळलेल्या मुसळधारांमुळे या सर्व विभागांमध्ये छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. त्यामुळे या मजल्यावरील रुग्णकक्षांमधील रुग्णांची अवस्था बिकट झाली होती.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील रुग्णांना अन्य रुग्णकक्षात हलविण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील रुग्णांना अन्य विभागामध्ये हलविणेही शक्य नाही. परिणामी, या रुग्णांना गळक्या छताखालीच राहवे लागले आहे. त्याचबरोबर या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागामध्येही मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. शस्त्रक्रिया विभाग जंतूसंसर्गमुक्त करण्यासाठी पुढील काही दिवस बंद ठेवावा लागणार आहे. यामुळे शस्त्रक्रियेसाठी असलेल्या रुग्णांचे हाल होणार आहेत.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील विविध विभागांची नुकतीच डागडुजी करण्यात आली होती. त्यासाठी काही दिवस हा मजला पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मात्र मंगळवारच्या जोरदार पावसामुळे झालेल्या गळतीमुळे कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या डागडुजीसाठी आतापर्यंत खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर होत असलेल्या पाण्याच्या गळतीबाबत व्ही. एन. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जयराज आचार्य यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली.