लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबईत १५ टक्के पाणी कपात असतानाच शनिवारी दुपारी अचानक तानसा जलवाहिनी फुटली. जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून या कामामुळे शनिवारी दादर, धारावी, माहीम तसेच विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व भागात पाणीपुरवठा होणार नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीवर दुपारी ३.३० च्या सुमारास पवई येथे आकस्मिकरित्या मोठी पाणी गळती सुरू झाली. या गळती दुरुस्तीच्या कामासाठी तानसा जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद करावा लागला. पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा जल अभियंता खात्याने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- खड्डे बुजविण्यासाठी दामदुप्पट खर्च; महानगरपालिका यंदा ९२ कोटी रुपये खर्च करणार

अचानक उद्भवलेल्या या गळतीमुळे अंधेरी, जोगेश्वरी पूर्व परिसर व दादर, माहीम, धारावी परिसरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पूर्व’ आणि ‘जी उत्तर’ विभागाचा पाणीपुरवठा प्रभावित होणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.