महिन्याभरात बिबट्याचे ५ हल्ले

मुंबई : बिबट्याचा अधिवास असलेल्या आरे दुग्ध वसाहतीच्या परिसरातील जंगल आक्रसल्याने या भागात बिबट्या आणि मानव संघर्ष वाढू लागल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्याभरात बिबट्याने येथील पाच रहिवाशांवर हल्ले केले असून बुधवारीही एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर बिबट्याने हल्ला केला.

 आरेतील विसावा इमारतीच्या जवळ असणाऱ्या वसाहतीतील ६९ वर्षीय रहिवासी निर्मला सिंह बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घराच्या बाहेरील कठड्यावर बसल्या असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर मिळालेल्या सीसीटीव्ही दृश्यांनुसार हा बिबट्या हल्ल्याच्या काही वेळ आधीपासूनच या परिसरात वावरत होता. निर्मला यांनी दार उघडताच तो जवळच असलेल्या ड्रमच्या बाजूला लपला. त्या बेसावध असताना दबक्या पावलांनी येत बिबट्याने त्यांच्या उजव्या बाजूने हल्ला चढवला.

बिबट्याची चाहूल लागताच निर्मला यांचेही त्याच्याकडे लक्ष गेले व त्यांनी प्रतिकार केला. त्यांच्या हातातील काठी तोंडावर लागल्याने तो दूर गेला. निर्मला यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत येत असल्याचे पाहून बिबट्या जवळच्या रानात जाऊन पुन्हा लपला. निर्मला यांच्या मुलाने संजयने त्याच्यावर प्रकाशझोत टाकताच तो आणखी दूर पळाला. निर्मला यांच्या गालावर, खांद्यावर, गुडघ्याला जखमा झाल्या आहेत.

यापूर्वी २६ सप्टेंबरला युनिट ३ येथे आयुष यादव या ४ वर्षीय मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. आयुषच्या मामाने त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. १८ सप्टेंबरला युनिट ३१ येथे ११ वर्षीय रोहितवर बिबट्याने हल्ला केला असता त्याच्या वडिलांनी बिबट्याच्या डोळ्यांवर प्रकाशझोत टाकून रोहितला वाचवले. याच परिसरात लक्ष्मी उंबरसडे यांच्यावर ३० ऑगस्टला हल्ला झाला होता. त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला युनिट ३२ येथे आणखी एका तरुणावर हल्ला झाला. 

बिबट्याचा वावर का वाढला?

मानवी वस्तीजवळ असलेल्या अस्वच्छतेमुळे येथे कुत्र्यांचा वावर अधिक असतो. सहज उपलब्ध होणारे खाद्य म्हणून बिबटे कुत्र्यांच्या  मागावर येतात. अशा वेळी एखादा मनुष्य दिसल्यास स्वसंरक्षणार्थ अथवा अनवधानाने बिबट्या त्याच्यावर हल्ला करतात. रात्रीच्या काळोखात असे हल्ले अधिक होतात. बिबट्या एका मांजराच्या मागे धावत असल्याची चित्रफीत काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे, कुत्र्यांना दूर ठेवणे, भरपूर प्रकाश असणे, इत्यादी उपाय वन विभागातर्फे सुचवण्यात आले आहेत. ‘आरेमध्ये स्वच्छता करण्यास सुरुवात झाली असून गस्तही सुरू आहे. तसेच जनजागृती केली जात आहे’, असे साहाय्यक वन संरक्षक रामेश्वरी बोंगळे यांनी सांगितले.

आदिवासींचे अन्यत्र पुनर्वसन

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे तसेच पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठीच्या जागा निश्चितीसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दिले. जंगल हे आपले वैभव असून ते वाढवतांना लोकांच्या प्रश्नांचीही आपल्याला सोडवणूक करावयाची आहे असे सांगून ठाकरे यांनी पुनर्वसित झालेली कुटुंबे पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहण्यास येणार नाहीत याची दक्षता वन विभागाने घ्यावी अशा सूचना दिल्या. उद्यानातील ४३ आदिवासी पाड्यांमध्ये १७९५ कुटुंबे  आहेत.