हमखास उपचार उपलब्ध असतानाही लेप्टोमुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांबाबत पालिकेच्या मृत्यू अवलोकन समितीच्या अहवालात निश्चित भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र आतापर्यंत झालेल्या १५ मृत्यूंपैकी १३ मृत्यू हे एकाच परिसरातील असून पालिका रुग्णालयातही आजाराचे निदान योग्य प्रकारे न झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मालाड ते दहिसर या भागात लेप्टोने हातपाय पसरवले असून आणखी एक बळी घेतला आहे. मालाड (पूर्व) येथील कुरार गावातील पुरुषाचा (४६) गुरुवारी रात्री मृत्यू झाला. २ जुलैपासून नऊ जुलैपर्यंत लेप्टोचे १५ मृत्यू झाले असून जुलैमधील लेप्टोस्पायरोसिसच्या निश्चित रुग्णांची संख्याही एका दिवसात १६ ने वाढून ४६ वर पोहोचली. लेप्टोवर उपचार उपलब्ध असतानाही मृत्यू होत असल्याचे कारण अयोग्य निदानामध्ये असल्याचा संशय वाढला आहे. लेप्टोची सुरुवातीची लक्षणे ही तापाप्रमाणेच असतात, त्यामुळे निदानात चूक झाल्याची शक्यता आहे. मात्र रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळालेले दिसत नाहीत, असे एका आरोग्य अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पालिकेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी मात्र याबाबत मौन बाळगून आहेत.  २०१० ते २०१४ या काळात लेप्टोस्पायरोसिसचे ९०४ रुग्ण आढळले. त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला होता. रुग्णांच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण अवघे तीन टक्के होते. मात्र जुलैच्या पहिल्या आठवडय़ात लेप्टोच्या २१ रुग्णांपैकी १२ रुग्णांचा (५० टक्क्यांहून अधिक) मृत्यू झाला. लेप्टोवर हमखास उपचार उपलब्ध असतानाही मालाड ते दहिसर या परिसरातील हे मृत्यू संशयास्पद होते. महत्त्वाचे म्हणजे १५ पैकी १२ मृत्यू कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात झाले.
त्यापूर्वी रुग्णांनी दवाखान्यात तसेच नर्सिग होममध्ये उपचार घेतले होते. आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पालिकेच्या रुग्णालयात आल्याने प्रभावी उपचार देता आले नाहीत, असे स्पष्टीकरण पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र रुग्णालयात येण्यापूर्वी रुग्णांनी नेमके कुठे व कोणते उपचार घेतले आणि त्याचा काय परिणाम झाला याबाबत पालिकेचे अधिकारी स्पष्ट माहिती देण्यास तयार नाहीत.
लेप्टोच्या मृत्यूंचा अभ्यास करण्यासाठी केईएम, नायर व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची समिती पालिकेकडून नेमण्यात आली होती. रुग्णालयाकडून देण्यात आलेले उपचार तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सुरू असलेली आरोग्य मोहीम योग्य असल्याचा निर्वाळा या समितीने दिला आहे.
त्याचप्रमाणे लेप्टोस्पायरोसिसची साथ आटोक्यात आणण्यासाठी कचरा व उंदीर यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शिफारस करण्यात आली, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. मृत्यूंमागे कोणतेही वेगळे कारण आढळले नसल्याने अहवाल प्रसिद्ध केला नसल्याचे त्या म्हणाल्या.