मुंबई : जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार बेकायदा पद्धतीने हाती घेत बकरी ईदच्या आधी ‘राज्य गोसेवा आयोगा’ने सर्व ‘कृषी उत्पन्न बाजार समितीं’ना आठवड्यासाठी गुरांचे सर्व बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परिणामी, ७० बाजारांमध्ये गुरांची विक्री ठप्प राहिली तर उर्वरित गुरांचे बाजार विस्कळीत झाले. ‘बकरी ईद’ आणि खरिप हंगामाच्या तोंडावर जनावरांच्या खरेदी- विक्रीत तेजी असताना पशुपालक व शेतकऱ्यांना आयोगाच्या भूमिकेमुळे जनावरे मंदीत विकावी लागल्याने मोठा फटका बसला आहे.
राज्यात ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्या, ६२५ उपबाजार व त्याला संलग्न १४५ गुरांचे बाजार आहेत. गुरांच्या प्रत्येक बाजारात सरासरी अडीच ते पाच कोटींची दिवसाची उलढाल होते. ७ जून रोजी ‘बकरी ईद’ असल्याने ३ ते ८ जून दरम्यान गुरांचे सर्व बाजार बंद ठेवण्याचे राज्य गोसेवा आयोगाने २५ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र पाठवले. दरम्यान हा विषय काही संघटनांनी मुख्यमंत्र्यापर्यंत नेला. त्यानंतर आयोगाने गुरांचे बाजार भरवण्यात यावेत, असे २ जून रोजी पत्र पाठवले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी देशी गोवंशाचा बाजार भरवण्यात येवू नये, असे आयोगाने ३ जून रोजी तिसरे पत्र जारी केले.
तीन पत्रांच्या गोंधळात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ‘बकरी ईद’साठी पशुपालक काळे बोकड सांभाळतात. त्यांस २५ ते ९० हजारांचा दर मिळतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात या आठवड्यात बैलांची खरेदी-विक्री मोठी होते. ‘ईद’च्या पार्श्वभूमीवर अनेक बाजार आठवड्यातून तीनवेळा भरतात. याविषयी ‘कुरेश वेल्फेअर असोसिएशन’चे उमर अन्सारी म्हणाले की, ‘कुर्बानी’ची कोंडी करण्यासाठी बाजार बंद ठेवले, पण याचा फटका शेतकरी व पशुपालकांना जास्त बसला.’
गुरांचे बाजार आजपर्यंत केवळ करोना आणि लंपी काळात बंद होते. ३ ते ८ जून दरम्यान राज्यातील निम्यापेक्षा जास्त जनावारांचे बाजार विस्कळीत झाले. पशुपालक व शेतकऱ्यांना याचा फटका बसला. ‘ईअर टॅग’ असलेल्या पशुंची बाजारत खरेदी- विक्री होते.-विकास रसाळ, पणन संचालक
आम्ही बाजार बंद ठेवण्याची विनंती केली होती. चूक समजल्यावर सुधारित पत्र काढले. ‘बकरी ईद’च्या आठवड्यात वर्षातून एकदा जनावरांचा बाजार बंद ठेवला तर काही बिघडत नाही. त्यामुळे लाखों मुक्या जीवांचे प्राण वाचतात.-शेखर मुंदडा, अध्यक्ष, राज्य गोसेवा आयोग