मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या एलटीटी – कोचुवेली गरीबरथ एक्स्प्रेसने कात टाकली असून या रेल्वेगाडीला लिके हॉफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे गरीबरथ एक्स्प्रेसच्या डब्यांची लांबी – रुंदी, रुंद प्रवेशद्वार, सुधारित रचनेतील बेसीन आणि शौचालय अशा बदललेल्या रुपातील रेल्वेगाडी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे. रविवारपासून लाल आणि करड्या रंगातील एलएचबी रेकसह गरीबरथ एक्स्प्रेस धावणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्याला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागातील जुन्या प्रकारातील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांचे रुपांतर नव्या प्रकारातील एलएचबी डब्यात करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वेगवान प्रवास होण्यासाठी एलएचबी डबे महत्त्वाचे आहेत. कोकण रेल्वेमधील अनेक रेल्वेगाड्यांना एलएचबी डबे जोडण्यात येत आहेत. आता गाडी क्रमांक १२२०२ कोचुवेली – एलटीटी गरीबरथ एक्स्प्रेस रविवारपासून आणि गाडी क्रमांक १२२०१ एलटीटी – कोचुवेली गरीबरथ एक्स्प्रेस सोमवारपासून अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे. गरीबरथ एक्स्प्रेला पूर्वी १५ डबे होते. तर, आता या एक्स्प्रेसला २१ डबे जोडले जाणार आहेत. यात १६ तृतीय श्रेणी वातानुकूलित इकाॅनाॅमी डबे, ३ वातानुकूलित चेअर कार डबे, २ जनरेटर कार असे डबे असतील. गरीब रथ एक्स्प्रेसच्या एलएचबी डब्यांची बांधणी स्टीलने केली असून आत ॲल्युमिनिअमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेगाडीचे वजन कमी होणार असून एक्स्प्रेसचा वेगही वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच एलएचबी डबे ॲण्टी टेलिस्कोपिक पद्धतीचे असून त्याचे वजन साधारण ३९.५ टन वजन आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी असते. एखाद्या वेळी अपघात झाल्यास जीवितहानी कमी होण्याची शक्यता असते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.