मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर मधील काही भागात शनिवारी हलक्या सरींची, तर काही भागात शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत शनिवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहील.

सायंकाळी किंवा रात्री काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. याचा तापमानावर फारसा फरक पडणार नाही. मात्र असह्य उकाड्यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरांत पाऊस अधिक पडतो. पुढील दोन – तीन दिवस मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे. विदर्भामधील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर मराठवाड्यातील काही भागात मागील चार दिवसांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात, तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा

नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेच्या किनारपट्टीवरच

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी अरबी समुद्रापर्यंत वाटचाल करीत श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली होती. नैऋत्य मोसमी वारे शुक्रवारीही श्रीलंकेच्या किनारपट्टीवरच होते. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागासह संपूर्ण अंदमान बेटांवर मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.