सात वर्षांपूर्वी नायजेरियाजवळ समुद्रात जहाजावर झालेल्या अभियत्यांच्या हत्येप्रकरणी त्याच्या सहकारी अभियंत्याला सत्र न्यायालयाने आजन्म कारावास आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षांंची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
  २००५ मध्ये ग्रेट इस्टर्न कंपनीचे जगलीला हे तेलवाहू जहाज १२ जूनला नायजेरियात गेले होते. नायजेरियातील लागोसजवळच्या समुद्रात असताना अरविंद सिंग (२८) हा अभियंता बेपत्ता झाला होता. त्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर युनिट १ ने या प्रकरणाचा तपास सुरू केला. युनिट १ चे अधिकारी दीपक ढोले, जयप्रकाश भोसले यांनी नायजेरियात जगलीला जहाजावर जाऊन तपास केला होता. याप्रकरणी सिंग याचा सहकारी अभियंता ग्यानेंद्र चव्हाण (२२) याला अटक केली होती. क्षुल्लक भांडणातून चौहान याने सिंग यांची हत्या करून त्याचा मृतदेह समुद्रात टाकून दिल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू  होती. मंगळवारी सत्र न्यायालयाने ग्यानेंद्र याला दोषी धरत आजन्म कारावासाची शिक्षा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.