मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहून, फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील ६५ महिलांच्या नावावर २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
आरोपींमध्ये मानखुर्द परिसरातील एका महिलेसह चार ते पाच जणांचा समावेश असून, या प्रकरणात वित्त कंपनीतील दोन कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्य सरकारने गतवर्षी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मात्र कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्याचाच फायदा घेत या महिलांची फसवणूक करण्यात आली.

मोबाइलसह नुसतेच छायाचित्र

या महिलांना कोणतीही माहिती न देता खासगी वित्तसंस्थांकडून परस्पर कर्ज देऊन कंपनीमार्फत महागडे आयफोन खरेदी करण्यात आले. संबंधित महिलांना कुर्ला आणि अंधेरी येथील दुकानात नेऊन मोबाइलसह त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडून हे मोबाइल काढून घेण्यात आले.

महिलांना २ ते ५ हजारांवर बोळवण करण्यात आली. त्यांना लाडकी बहीण योजनेचा हा पहिला हप्ता असल्याचे सांगण्यात आले. तसेच पुढील हप्ता बँक खात्यात जमा होईल, अशी समजूत घालण्यात आली. मात्र ही रक्कम कर्ज असल्याची काहीही कल्पना या महिलांना नव्हती. मात्र या ६५ महिला अनेक महिन्यांपासून हप्ता भरत नसल्याची बाब कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात आली. त्याने मानखुर्द परिसरात जाऊन या महिलांची भेट घेतली. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या आमच्याकडे ६५ जणांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. मात्र ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. – मधू घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानखुर्द