नाशिकमधील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही पक्षातील नगरसेवक आज शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. याचा सर्वात मोठा फटका मनसेला बसताना दिसत आहे. नाशिकमध्ये मनसेचा प्रभाव कायम ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे नगरसेवक अशोक सातभाई शिवसेनेत तर शशिकांत कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक सातभाई यांच्या रूपाने शिवसेनेच्या गळाला मोठा मासा लागल्याची चर्चा आहे. अशोक सातभाई यांनी नाशिकरोड परिसरात जनतेसाठी अनेक उपक्रम राबवले होते. तर शशिकांत कदम यांनीदेखील पक्ष वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय, नगरसेविका मनिषा बेंडकुळेही भाजपच्या मार्गावर असल्याचे समजते. त्यामुळे मनसेला आगामी पालिका निवडणूक लढवणे अवघड जाणार आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चुंबळे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
नाशिक शहरात मनसेला मोठे खिंडार पडत असताना ठाण्यात मात्र पक्षाच्यादृष्टीने आश्वासक घटना घडत आहेत. ठाणे शहर विभागातून शिवसेनेचे हजारपेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते थोड्याच वेळात कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश घेणार आहेत. ठाण्याचे शहर प्रमुख अविनाश जाधव यांनी हा दावा केला आहे. यामध्ये कळवा-दिव्यातील ९० टक्क्यांहून जास्त कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, यापैकी कोणालाही तिकीट देण्याच्या आश्वासनावर घेतले नसल्याचे स्पष्टीकरणही जाधव यांनी दिले आहे.