मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी चर्नी रोड स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान अप जलद मार्गावरील सर्व स्थानकात लोकल गाडय़ांना थांबा देण्यात येणार आहे. सध्या सायंकाळी गर्दीच्या वेळी या स्थानकादरम्यान जलद मार्गावर लोकल गाडय़ांना थांबा नाही.
९ सप्टेंबर सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या कालावधीत लोकल गाडय़ांना थांबा असेल, अशी माहिती देण्यात आली. त्यादिवशी सायंकाळी ५ ते १० या वेळेत सर्व अप धिम्या मार्गावरील गाडय़ा चर्चगेटकडे जाताना चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर मात्र थांबणार नाहीत. या कालावधीत चर्नी रोड स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरून एकही गाडी उपलब्ध होणार नाही. दरम्यान, चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री आठ विशेष फेऱ्याही चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विरारहून पहिली विशेष उपनगरीय फेरी मध्यरात्री सव्वा बारा वाजता चर्चगेटसाठी सुटेल. विरारहून दुसरी विशेष उपनगरी लोकल मध्यरात्री पावणे एक वाजता चर्चगेटसाठी सुटणार आहे. विरारहून तिसरी विशेष सेवा मध्यरात्री ०१.४० वाजता आणि विरारहून चौथी विशेष लोकल पहाटे ०३.०० वाजता सुटणार आहे. त्याचप्रमाणे डाऊन दिशेने पहिली विशेष सेवा चर्चगेटहून मध्यरात्री ०१.१५ वाजता विरारसाठी, दुसरी लोकल चर्चगेटहून मध्यरात्री ०१.५५ वाजता, तिसरी लोकल चर्चगेटहून मध्यरात्री ०२.२५ वाजता आणि चौथी विशेष लोकल चर्चगेटहून ०३.२० वाजता विरारसाठी सुटेल.