राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा वारंवार सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र, त्याच वेळी विरोधी पक्षांसोबतच महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी देखील लॉकडाऊनवर ट्वीटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. तसेच, थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन त्यांना आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा पुरवठा होईल, याची सोय करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. “मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितलं, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण नुसरं फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल नाहीत”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
CM on Maharashtra Lockdown : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “येत्या एक-दोन दिवसांत…!”

आनंद महिंद्रांनी काय केलं होतं ट्वीट?
महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट करून लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केला होता. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं.
“उद्धवजी, समस्या ही आहे की…”, Lockdown वरून आनंद महिंद्रांचे मुख्यमंत्र्यांना परखड बोल!
“आता रस्त्यावर उतराच!”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या इतरांना देखील आव्हान दिलं. “जे म्हणतायत, की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, त्यांना मी म्हणतो जरूर उतरा, उतरलंच पाहिजे. पण ते लॉकडाऊनच्या विरोधात नाही, तर लॉकडाऊन होऊ नये, म्हणून करोनाच्या विरोधात तुम्ही उतरा. या डॉक्टर्सना मदत करायला तुम्ही रस्त्यावर उतरा. नुसतं बोलायला ठीक आहे की अमुक केलं की आम्ही रस्त्यावर उतरू, माझं म्हणणं आहे की आता उतराच. कारण ही लढाई आपल्याला हातात हात घेऊन लढावी लागणार आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the state https://t.co/aU3H6umKzm
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 21, 2021
महाराष्ट्रात लॉकडाऊनसंदर्भात बोलताना, “आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.