मुंबई : ‘संधी काली या अशा’, ‘या चिमण्यांनो…’, कधी ‘सूरमयी शाम’ तर कधी ‘दिस नकळत जाई’ अशा एकाहून नामवंत गीतकारांच्या बहारदार रचनांना कलाकारांनी आपल्या स्वरसाज चढविला. ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावरची ही सायंकाळ अशी शब्द आणि सुरात रंगून गेली होती.

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या सहाव्या दिवशी पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघातील सभागृहात सुरांची अनोखी मैफल रसिक प्रेक्षकांना अनुभवता आली. मराठी आणि हिंदीतील प्रतिभावंत गीतकार आणि कवींच्या रचना मंदार आपटे, अर्चना गोरे, केतकी भावे-जोशी आणि डॉ. जय आजगावकर आदी गायक कलाकारांनी यावेळी सादर केल्या. यात भा. रा. तांबे, गदिमा, मंगेश पाडगावकर, सु

धीर मोघे, ग्रेस ते गुलजार, लक्ष्मीकांत प्यारेलाल, वसंत देव आदींच्या बहारदार सांजगीतांच्या मैफलीत कलाकारांनी आपल्या स्वरातून रंग भरले. सायंकाळचा स्वरभाव टिपणाऱ्या विविध गीतांनी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘मावळत्या दिनकरा’ या गीताने अर्चना गोरे यांनी या मैफलीला सुरुवात केली. पुढे ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘भय इथले संपत नाही’, ‘सांज ये गोकुळी’, ‘डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी’ अशी एकाहून एक प्रसिद्ध गाणी यावेळी सादर झाली. यावेळी ढोलकीवर तुषार देवल, तबल्यावर अमेय ठाकूरदेसाई, ऑक्टोपॅडवर चेतन परब, संवादिनीवर संदीप मेस्त्री आणि बासरीवादक प्रणव हरिदास यांची साथसंगत लाभली.

मारवा रागातील सुरेल गीते

तुडुंब भरलेल्या सभागृहात संध्याकाळ अशी स्वरातून अवतरली आणि रसिक प्रेक्षकांना एका सांजस्वरांनी रंगलेल्या मैफलीचा आनंद घेता आला. ‘मारवा, ललित हे संध्याकाळचे सुंदर राग. पार्ल्यातील अनेक घरांमधून तरुण परदेशात स्थायिक आहेत, तर आई-वडील इथे एकटे आहेत. या आई-वडिलांच्या पिढीला मारवा रागातील सांजगीतांची एक सुरेल मैफल अनुभवता यावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते’, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी रसिकांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

‘संध्याकाळची गाणी’ या कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यांच्या जन्मकथा, गीतकार-संगीतकारांचे किस्से गुंफत निवेदक कुणार रेगे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी सारस्वत बँकेचे सतीश लोटलीकर, मृदुला रेगे आणि कालनिर्णयच्या शामल टाककर यांच्या हस्ते ‘संध्याकाळची गाणी’ कार्यक्रम सादर करणाऱ्या गायक-गायिका आणि वादक यांचा सत्कार करण्यात आला. हिंदी-मराठी अशा लोकप्रिय सांजगीतांनी रंगलेल्या या सुरेल मैफलीचा समारोप किशोरी आमोणकर यांच्या ‘हे श्यामसुंदर राजसा’ या केतकी भावे जोशी यांनी गायलेल्या गाण्याने करण्यात आला.