मुंबई : साहित्य, संगीत, चित्र, काव्य, नाट्य, चर्चासत्रे, पुस्तक प्रदर्शने… अशा विविध रंगांनी सजलेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या पहिल्या पर्वाची शनिवारी ठाण्यात दिमाखात सांगता झाली. सूर-तालाचा श्राव्यानंद, चित्रप्रदर्शने, विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती यातून मिळणारा दृश्यानंद, काव्यवाचनाला मिळणारी दिलखुलास दाद, मुशायराचा साज अशी कलारंगांची उधळण या महोत्सवात झाली.
ज्येष्ठ नाटककार आणि विचारवंत महेश एलकुंचवार यांनी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ ची मुहूर्तमेढ रोवली आणि ‘रवींद्रनाथ टागोर आणि पु.ल देशपांडे’ या कलांच्या प्रांतातील दोन प्रतिभावंत हिमशिखरांचे स्मारक असलेला ‘रवींद्र’च्या प्रांगणातून हा उत्सव सुरू झाला.
कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने महाराष्ट्राचे साहित्यिक, सांस्किृतिक विश्व साकारले. मुंबईनंतर कल्याण येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह, पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाचे सभागृह, ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमांनंतर राम गणेश गडकरी रंगायतन येथे या कला जल्लोषाची शनिवारी सांगता झाली. आठ दिवसांच्या उत्सवी वातावरणात प्रत्येकाच्या आवडीचे इथे काही ना काही होते. कार्यक्रम, चर्चासत्रे यांसह पुस्तक प्रदर्शनात अक्षरांच्या वाटांनी अनेक वाचकांना खुणावले. पुस्तकांपाशी रेंगाळा किंवा चर्चासत्रांतून वैचारिक मेजवानी घ्या. कधी कलाकृती आणि चित्रांचे निरीक्षण तर कधी कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. आपल्याच कला संस्कृतीतील परिचित आणि अपरिचित अनुभवांचा आनंद उपस्थितांना मिळाला. ज्येष्ठ बासरी वादक रोणू मजुमदार, ज्येष्ठ गायिका, डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे, परवीन सुलताना, रोंकिणी गुप्ता यांची स्वरानुभुती, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरूणा ढेरे यांनी दिलेला काव्यानंद, संगीतातील नव्या पिढीचे दमदार सादरीकरण, प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेलेले नाट्यप्रयोग, खाद्यासंस्कृती, पारलिंगीची अभिव्यक्ती, साहित्यातील डॉक्टरांचे स्थान, नव्या पिढीतील लेखकांचा आवाज, कवयित्रींच्या रचनांतील स्त्रीत्वाचा हुंकार तर श्रीनिवास खळे यांना सोनिया परचुरे यांनी दिलेली नृत्यवंदना अशा कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या लोकसत्ता अभिजात लिटफेस्टची भैरवी प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी सादर केली. शेवटच्या दिवशी ज्येष्ठ चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्यावरील लघुपटाचे सादरीकरण झाले.
