जिल्ह्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्याोगिक, आरोग्यविषयक प्रगतीची सांगड घालून विकासाची शास्त्रीय मांडणी असलेला ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. निर्देशांकात लक्षवेधी कामगिरी नोंदवणाऱ्या जिल्ह्यांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे.
देश आणि राज्य यांच्या विकासाचे मोजमाप करणारी शास्त्रशुद्ध पद्धत रूढ झाली असली तरी, देशाच्या एकंदर विकासात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यांची प्रगती मोजणाऱ्या स्वतंत्र व्यवस्थेचा अभाव जाणवतो. ही उणीव दूर करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘जिल्हा निर्देशांक’ हा उपक्रम हाती घेतला.
१२ घटकांत उपलब्ध सांख्यिकीचे विश्लेषण करून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक, पायाभूत सुविधाविषयक प्रगतीची मांडणी करणाऱ्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’चे यंदा तिसरे पर्व. मुख्य प्रायोजक सारस्वत बँक असलेल्या या उपक्रमाचे ‘नॉलेज पार्टनर’ पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स हे आहेत. महानिर्मिती आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड हे ‘पॉवर्डबाय’ पार्टनर आहेत.