परीक्षक, मार्गदर्शक, रंगकर्मीचा विश्वास; स्पर्धेतील सहभागी तरुणांना सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता-लोकांकिका’मध्ये सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हाती अनुभवाची शिदोरी लागणार असून त्यावर घडत गेलेली ही पिढी भविष्यात गुणवत्तापूर्ण आणि सुदृढ रंगभूमीसाठी निश्चित लाभदायी ठरेल, असा विश्वास ‘लोकसत्ता-लोकांकिका’च्या आजवरच्या प्रवासात परीक्षक, मार्गदर्शक या नात्याने सहभागी झालेल्या ज्येष्ठ व अनुभवी रंगकर्मीनी व्यक्त केला.

‘लोकसत्ता-लोकांकिका’स्पर्धेच्या मुंबई विभागाची अंतिम फेरी येत्या ११ डिसेंबर रोजी मुंबईत रंगणार आहे. या फेरीत मुंबई विभागातून सहा एकांकिकांची निवड करण्यात आली असून या सहा एकांकिकांमधून ‘लोकसत्ता-लोकांकिका’ महाअंतिम फेरीसाठी एकांकिकेची निवड केली जाणार आहे. यानिमित्ताने राज्यातील विविध महाविद्यालयांतील तरुणाईचा जोश आणि कलागुण पाहायला मिळत आहेत. नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांशी संबंधित ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक या उपक्रमात परीक्षक, मार्गदर्शक या नात्याने सहभागी झाले आहेत. मुंबई विभागाच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने ज्येष्ठ नाटय़-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी व ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे  मनोगत..

महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने त्यांना अनुभवासह खूप काही शिकायलाही मिळते. त्यातून तो घडत जाऊन पुढे आलेली गुणवत्ता परिपूर्ण आणि सुदृढ रंगभूमीसाठी उपयोगी पडू शकते.

– चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

या स्पर्धेतून धाडसी विषय आणि विचार समाजापुढे यावेत. केवळ विषय न मांडता त्यावर काही उपाय सुचविता आला तर तोही सुचवावा.

– सुकन्या कुलकर्णी, अभिनेत्री

* लोकसत्ता-लोकांकिका’ हा राज्यस्तरीय उपक्रम स्तुत्य असून या निमित्ताने नवे लेखक, कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ घडविण्याचे, अनुभवातून शिकण्याचे सशक्त व्यासपीठ आहे.

– मकरंद अनासपुरे, अभिनेता

* लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेतून विषयाचे नावीन्य आणि वेगळेपण पाहायला मिळते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील सुप्त व विविध कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ आहे.

– प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या परीक्षकांचा मोलाचा सल्ला

‘लोकसत्ता-लोकांकिका’, ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्त्रेषु’ या दोन्ही स्पर्धाशी मी या ना त्या प्रकारे निगडित असून दोन्ही उपक्रमांत सहभागीही झालो आहे. आजच्या तरुणाईला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मला स्वत:ला अशा वत्कृत्व आणि एकांकिका स्पर्धाचा खूप फायदा झाला आहे. अनेकदा एखादा उपक्रम सुरू होतो आणि नंतर तो उपचार म्हणून पार पाडला जातो. पण ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धा त्याला अपवाद आहे. अत्यंत गांभीर्याने आणि दर वर्षी काही ना काही वेगळ्या कल्पना राबवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई व पुणे या शहरी भागातील ‘स्मार्ट’ रंगकर्मी आणि ग्रामीण भागातील आशयाला धरून काम करणारे रंगकर्मी याच्या पातळीचा स्पर्धेच्या निमित्ताने कस लागतो. महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविल्याने त्यांना अनुभवासह खूप काही शिकायलाही मिळते.

– चंद्रकांत कुलकर्णी, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते

‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेतून धाडसी विषय आणि विचार समाजापुढे यावेत. आजच्या तरुणाईला आरोग्य, शिक्षण, नोकरी, करिअर, विवाह आणि इतर अनेक विषय भेडसावत आहेत. स्पर्धा व ताणतणाव यामुळे विविध शारीरिक आणि मानसिक आजारांचाही सामना तरुणाईला करावा लागत आहे. काही गोष्टी त्यांच्या मनात आहेत पण त्या ते व्यक्त करू शकत नाहीत. यातून त्यांची मानसिक घुसमटही होत आहे. त्यामुळे अशा सर्व विषयांना स्पर्श या स्पर्धेच्या माध्यमातून व्हावा. तसेच केवळ विषय न मांडता त्यावर काही उपाय सुचविता आला तर तोही सुचवावा. काही अपवाद वगळता सहभागी होणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषकडेही नीट लक्ष देणे गरजेचे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी लेखकांसाठी स्पर्धेच्या दोन-तीन महिने अगोदर लेखन कार्यशाळा/मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जावे, असे सुचवावेसे वाटते. मान्यवर नाटककार, लेखक यांचे मार्गदर्शन त्यांना यातून मिळाले तर अधिक चांगले होईल. सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला म्हणजे आता व्यावसायिक नाटकात, मालिकेत काम मिळेल असा कोणताही हेतू मनाशी बाळगू नये. आपल्याला शिकायचे आहे, अनुभव घ्यायचा आहे आणि चांगले ‘नाटक’ करायचे आहे हा विचार मनात ठेवावा.

– सुकन्या कुलकर्णी, अभिनेत्री

‘लोकसत्ता-लोकांकिका’ हा राज्यस्तरीय उपक्रम स्तुत्य असून या निमित्ताने नवे लेखक, कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ घडविण्याचे, अनुभवातून शिकण्याचे एक सशक्त व्यासपीठ आहे. अन्य स्पर्धाशी ‘लोकसत्ता लोकांकिका’ची तुलना केली तर जाणवणारे महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे स्पर्धेत पूर्णपणे नवी संहिता सादर केली जाते. पुनरुज्जीवित नाटक/एकांकिका यात सादर होऊ शकत नाही त्यामुळे स्पर्धेतून दर वर्षी नवे विषय, संहिता सादर होतात. ‘लोकसत्ता लोकांकिका’मधून तरुणाईला भेडसाविणाऱ्या विषयांबरोबरच सद्य:सामाजिक व राजकीय विषयांची थेट आणि निर्भीडपणे केलेली मांडणीही पाहायला मिळत आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि नाटकाच्या अन्य तांत्रिक बाजू आदी सर्व काही विद्यार्थीच सांभाळत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आहे.

– मकरंद अनासपुरे, अभिनेता

‘लोकसत्ता-लोकांकिका’स्पर्धेतून विषयाचे नावीन्य आणि वेगळेपण पाहायला मिळते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील सुप्त व विविध कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता, गुणवत्ता या निमित्ताने पाहता आणि पारखता येते. लेखन, दिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रात खरोखरच काही नवे करू पाहणारे व गुणवत्ता असलेले चेहरे समोर येत आहेत. रंगभूमी, दूरचित्र वाहिन्यांवरील मालिका, चित्रपट यासाठी नवी गुणवत्ता आणि चेहरे हवे असतात. ‘लोकसत्ता-लोकांकिका’ स्पर्धेतून भविष्यात अशी गुणवत्ता नक्की मिळेल.

– प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक

विभागीय अंतिम फेरी रविवार, ११ डिसेंबर

* वेळ- सकाळी ९-४५ वा.

* कुठे- स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)

(शब्दांकन- शेखर जोशी)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika 2016 mumbai division
First published on: 07-12-2016 at 01:09 IST