लोकसत्ता लोकांकिकास्पध्रेचे राज्यभरात लवकरच पडघम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मस्त पावसाळी हवा, हिरवाईने नटलेले डोंगर, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या.. एवढय़ा सगळ्या गोष्टी खुणावत असूनही महाविद्यालयातल्या एखाद्या वर्गात स्वत:ला कोंडून आता नाटकवेडय़ांच्या तालमी सुरू झाल्या असतील. आषाढ सरून श्रावण सुरू झाला की ज्याप्रमाणे व्रतवैकल्ये, सणासुदीचा काळ येतो; त्याचप्रमाणे महाविद्यालये सुरू होऊन पहिला महिना सरल्यानंतर एकांकिका स्पर्धाचा माहोल सुरू झाला आहे. याच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाच्या मांदियाळीत स्वत:चे वेगळेपण जपणारी आणि दोनच वर्षांत स्वत:चा दबदबा निर्माण करणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा या रंगकर्मीच्या सर्जनाला आव्हान देण्यासाठी येत आहे. इतर स्पर्धाच्या चुरशीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर यंदा राज्यभरातील शेकडो महाविद्यालयांना त्यांची एकांकिका महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ बनवण्यासाठी या स्पध्रेत उतरावे लागणार आहे.

‘सॉफ्ट कॉर्नर’प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेचे तिसरे पर्व दिवाळीच्या सुट्टय़ांनंतर महाराष्ट्रभरात सुरू होणार आहे. पहिल्या पर्वापासूनच स्पध्रेच्या आगळ्यावेगळ्या स्वरूपामुळे ही स्पर्धा राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांचे आकर्षण ठरली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर प्राथमिक आणि विभागीय अंतिम अशा दोन फेऱ्यांमधून आठ उत्कृष्ट एकांकिका निवडल्या जातात. या आठ उत्कृष्ट एकांकिकांची महाअंतिम फेरी रंगते आणि त्या फेरीत सर्वोत्कृष्ट ठरलेली एकांकिका महाराष्ट्राची लोकांकिका ठरते.

  • यंदा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाची लगबग संपत आली की शेवटी दिवाळीनंतर या स्पध्रेचे शिवधनुष्य महाविद्यालयांना उचलावे लागणार आहे.
  • ही स्पर्धा राज्यभरात घेण्यासाठी ‘अस्तित्व’ या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
  • स्पध्रेतील प्रतिभावान कलाकारांना भविष्यात संधी देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन्स’ हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी असतील.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika coming soon
First published on: 07-08-2016 at 01:24 IST