नाटकवेडय़ा तरुणांच्या प्रयोगशीलतेला साद घालणाऱ्या, त्यांच्या नाटय़प्रतीभेला खुला मंच उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेसाठी सज्ज होण्याची वेळ आता आली आहे. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज उपलब्ध झाले असून ते त्वरित भरून ‘लोकांकिका’च्या रंगमैदानावर नाटय़विष्कारासाठी स्थान निश्चित करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे! नवीन विचार, नवी मांडणी, नवे प्रयोग, सळसळती ऊर्जा या सगळ्यांच्या अजब मिश्रणातून रंगणाऱ्या ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत, ‘केसरी’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. रंगभूमीवर नवे काही सांगू पाहणाऱ्या राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ने या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्याच वर्षी राज्यभरातील २००हून अधिक महाविद्यालयांनी आपल्या एकांकिका प्राथमिक फेरीत सादर करत या स्पर्धेचे जंगी स्वागत केले होते. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावर पूर्ण तयारीनिशी आपले नाटय़विचार घेऊन उतरणाऱ्या तरुणाईने या स्पर्धेला आपलेसे केले आहे. त्याच आपलेपणाने २६ नोव्हेंबरला ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ‘लोकांकिका’ स्पर्धेची कवाडे नाटय़वेडय़ांसाठी खुली होणार आहेत. यंदाही सर्वोत्तम ठरणाऱ्या गुणवंतांना मालिका-चित्रपटातून संधी देण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकांकिका’ची प्राथमिक फेरी मुंबई, पुणे, ठाणे यांच्यासह रत्नागिरी, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अहमदनगर अशा आठ केंद्रांवर रंगणार आहे. या आठही केंद्रांवरच्या प्राथमिक फेरीतून उत्तम एकांकिका त्या विभागांमधील अंतिम फेरीसाठी निवडल्या जातील आणि त्यानंतर विभागीय अंतिम फेरीत पहिली आलेली एकांकिका त्या विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाअंतिम फेरीत दाखल होईल. ही स्पर्धा थोडी उशिरा म्हणजे २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने तरुणाईला परीक्षेचा ताण बाजूला ठेवून पूर्ण जोशाने स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

राज्यातील आठ केंद्रांवर प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरी पार पडल्यानंतर स्पध्रेची महाअंतिम फेरी यंदा १७ डिसेंबर रोजी रंगणार आहे. त्यासाठी तालमीच्या तयारीला लागण्यापूर्वी ‘लोकांकिका’मध्ये आपल्या महाविद्यालयाची नोंद करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे प्रवेशिका  www. loksatta. com/lokankika2016   या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

  • प्राथमिक फेरी : २६ नोव्हेंबरपासून
  • केंद्र : मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, नागपूर, अहमदनगर आणि औरंगाबाद
  • महाअंतिम फेरी : १७ डिसेंबर
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika competitions
First published on: 03-10-2016 at 02:32 IST